Marathi News: ही घटना घडली चीनची राजधानी बीजिंगमध्ये. गेल्या रविवारी तिथे एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. आयोजकांनी हाफ मॅरेथॉन म्हणजे २१ किलोमीटरच्या शर्यतीचं आयोजन केलं होतं. या शर्यतीत अनेक नामांकित धावपटूंनी आणि उत्साही नागरिकांनीही भाग घेतला होता; पण याच शर्यतीत अजून एक जण होता. अतिशय नवखा. आजपर्यंत त्याला कोणीच, कधीच, कुठेच, कोणत्याच मैदानावर धावताना, सराव करताना पाहिलं नव्हतं. पण या धावपटूनं पहिल्याच प्रयत्नात ही कठीण हाफ मॅरेथॉन नुसती पूर्णच केली नाही, तर भल्याभल्यांना नमवत पहिला क्रमांकही पटकावला ! इथपर्यंतही ठीक होतं, पण या धावपटूनं चक्क वर्ल्ड रेकॉर्ड केलं!
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
कोण होता हा धावपटू? कुठलाही सराव नसताना, याआधी कोणीही त्याला साधं पाहिलेलंही नसताना थेट वर्ल्ड रेकॉर्ड?.. अर्थातच हा धावपटू कुणी ऐरागैरा सामान्य व्यक्ती नव्हता.. हा धावपटू होता Honor कंपनीनं बनवलेला ‘लाइटनिंग’ रोबोट. १६९ सेंटीमीटर उंचीच्या या ह्युमनॉइड रोबोटनं २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन केवळ ५० मिनिटं २६ सेकंदांत पूर्ण केली. विशेष म्हणजे माणसांचं हाफ मॅरेथॉनमधील वर्ल्ड रेकॉर्ड ५७ मिनिटे २० सेकंदांचं आहे. या रोबोटनं पहिल्याच प्रयत्नात तब्बल ७ मिनिटांनी हे वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढलं!
लाल रंगाचा हा रोबोट रस्त्यावर उतरला तेव्हा त्याचे हात हवेत अगदी व्यावसायिक खेळाडूप्रमाणे संतुलन साधत हलत होते. या रोबोटची बॅटरी आणि कूलिंग सिस्टीम अशा प्रकारे डिझाइन करण्यात आली होती की तो लांब अंतरापर्यंत गरम न होता धावू शकतो. आयोजकांच्या मते, यामध्ये बसवलेली नेव्हिगेशन प्रणाली त्याला मार्ग चुकू देत नाही आणि त्याची ‘बर्स्ट पॉवर’ त्याला चित्त्यासारखा वेग देते.
ही स्पर्धाच अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होती. या स्पर्धेत माणसांबरोबरच रोबोट्सही धावत होते. विविध कंपन्या आणि संशोधन संस्थांचे तब्बल ३००हून अधिक रोबोट्स या स्पर्धेत धावत होते. आपलाच रोबोट या स्पर्धेत जिंकावा, पुढे राहावा यासाठी कंपन्या प्रयत्नशील होत्या.
काही रोबोट्स पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने धावत होते, तर काहींना दूरस्थ नियंत्रणाद्वारे मार्गदर्शन केलं जात होतं. मानवी धावपटूंप्रमाणेच रोबोट्सनाही तेवढंच अंतर पूर्ण करायचं होतं, मात्र त्यांच्यासाठी स्वतंत्र ट्रॅक ठेवण्यात आला होता. या स्पर्धेत तब्बल १२,००० मानवी धावपटूंनी भाग घेतला होता. आपलं पारंपरिक कौशल्य, सहनशक्ती आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी शर्यत पूर्ण केली. दुसरीकडे, रोबोट्ससाठी ही शर्यत म्हणजे तांत्रिक कसोटी होती. बॅलन्स राखणं, ऊर्जा व्यवस्थापन, मार्ग ओळखणं आणि दीर्घकाळ हालचाल कायम ठेवणं ही त्यांच्यापुढची मोठी आव्हानं होती.
‘लाइटनिंग रोबोट’नं या स्पर्धेत इतिहास घडवला; पण सर्व रोबोट्सना असं यश मिळू शकलं नाही. अनेक रोबोट्स मध्येच थांबले, पडले किंवा तांत्रिक अडचणींमुळे शर्यत पूर्ण करू शकले नाहीत. मात्र मागील वर्षी जे रोबोट डगमगत होते, त्यांनी यावेळी आपली क्षमता सिद्ध करून दाखवली.
ही स्पर्धा मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील वाढत्या सहअस्तित्वाचं प्रतीक मानली जात असली, भविष्यात अशा स्पर्धांमुळे रोबोटिक्स क्षेत्रात मोठी प्रगती होण्याची शक्यता असली, तरी अनेक नामांकित धावपटूंची भावना मात्र आता आपल्यासमोर एक नवा, अतिशय तगडा प्रतिस्पर्धी आला आहे आणि भविष्यात या रोबोट्ससोबतही आपल्याला स्पर्धा करावी लागणार आहे, अशीच होती.. कारण अशा स्पर्धा भविष्यात होणार, हेदेखील अटळ आहे.
Web Summary : A Honor robot named 'Lightning' won a half-marathon in Beijing, setting a world record of 50 minutes 26 seconds, surpassing human records. Over 300 robots and 12,000 humans participated, showcasing advancements in robotics and AI.
Web Summary : बीजिंग में 'लाइटनिंग' नामक एक Honor रोबोट ने हाफ-मैराथन जीता, और 50 मिनट 26 सेकंड का विश्व रिकॉर्ड बनाया, जो मानव रिकॉर्ड से बेहतर है। 300 से अधिक रोबोट और 12,000 मनुष्यों ने भाग लिया, जो रोबोटिक्स और एआई में प्रगति को दर्शाता है।