महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
By यदू जोशी | Updated: May 8, 2026 07:55 IST2026-05-08T07:54:30+5:302026-05-08T07:55:44+5:30
पक्ष फुटले, चिन्हे फुटली, विचार फुटले, मतदारांचे भावविश्वही तुटले. एकट्याच्या बळावर भाजपला पराभूत करू शकेल असा एकही ‘थलपती’ राज्यात नाही.

महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
यदु जोशी
राजकीय संपादक, लोकमत
Marathi News: प्रस्थापित प्रादेशिक पक्षांना पश्चिम बंगाल, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत जबर हादरे बसले. कम्युनिस्ट पक्षाच्या आघाडीतील पक्ष स्वत:ला राष्ट्रीय म्हणवत असले तरी ते एकाअर्थाने प्रादेशिकच. भाजपने पश्चिम बंगालमध्ये गेली १५ वर्षे दिमाखात सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला चारी मुंड्या चीत केले. तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन प्रादेशिक पक्षांना टीव्हीकेने धूळ चारली. केरळमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडीने कम्युनिस्टांचा अखेरचा गड उद्ध्वस्त केला. या निकालांतील प्रादेशिक पक्षांच्या यशापयशाची सांगड महाराष्ट्रातील राजकारणाशी घालता येऊ शकेल.
भाजपसोबत असलेली शिंदेसेना आणि अजित पवार गट वगळता महाराष्ट्रात महत्त्वाचे अडीच प्रादेशिक पक्ष आहेत - उद्धवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि अर्धा पक्ष म्हणजे राज ठाकरेंची मनसे. आता मनसेला अर्धे तरी म्हणणेही धारिष्ट्याचे ठरावे अशी त्या पक्षाची अवस्था झाली आहे. राष्ट्रीय पक्ष आहेत दोन; भाजप आणि काँग्रेस. काँग्रेस आणि अडीच प्रादेशिक पक्ष असे साडेतीन पक्ष भाजपच्या विरोधात आहेत. महाराष्ट्रापुरता विचार केला तर शतप्रतिशतचे लक्ष्य गाठताना भाजप आपल्या मित्रपक्षांनाही आपल्यात सामावून घेणार नाही ना, अशी भीती आहे. आज सत्तेत असलेल्या तीन पक्षांनी सत्तारुढ आणि विरोधी पक्षांचीही जागा व्यापली आहे. पण भाजप आपल्या मित्रपक्षांची जागा कधी व्यापून घेईल, ते मित्रांनाही कळणार नाही. विशेषत: अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या पक्षातील प्रत्येक हालचालीवर भाजपची नक्कीच बारीक नजर असेल.
सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी जिंकल्या असल्या तरी त्या पक्षाला पूर्वीसारखेच मजबूत ठेवतात का, यावरच त्यांचे राजकीयदृष्ट्या जिंकणे वा हरणे अवलंबून असेल. काँग्रेस इतकी दुबळी झाली आहे की या पक्षाचे मित्र असलेले उद्धवसेना आणि शरद पवार गट त्याच्यावर दबाव टाकत असतात आणि काँग्रेस दबत जाते. राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत याचा अनुभव आलाच आहे. भाजपच्या मित्रपक्षांना भाजपची भीती वाटते आणि काँग्रेस तिच्या मित्रपक्षांना घाबरून राहते.
पश्चिम बंगालमध्ये पंधरा वर्षांची अभेद्य वाटणारी सत्ता कोसळली. तामिळनाडूत दशकानुदशके फिरणाऱ्या दोन दिग्गज प्रादेशिक पक्षांच्यामध्ये नव्या शक्तीने घुसखोरी केली. केरळमध्ये वैचारिक बालेकिल्लाच उद्ध्वस्त झाला. या तिन्ही राज्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली — जनतेला कायमस्वरूपी कुणीही गृहीत धरू शकत नाही. जनतेचा विश्वास वारसाहक्काने मिळत नाही; तो प्रत्येक निवडणुकीत पुन्हा कमवावा लागतो. ममता बॅनर्जी यांच्यासारख्या तगड्या नेत्याचा झालेला पराभव प्रादेशिक पक्षांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लावणारा ठरला आहे. महाराष्ट्रात आज परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे. येथे पक्ष फुटले, चिन्हे फुटली, विचार फुटले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांचे भावविश्वही तुटले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटींनी महाराष्ट्रातील प्रादेशिक राजकारणाचा आत्माच हादरवून टाकला. आज प्रश्न केवळ कोण जिंकणार याचा नाही; तर ‘महाराष्ट्राच्या अस्मितेचे राजकारण पुढे कोण नेणार?’ हा आहे.
कोणी थलपती नाही
पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विरोधात एकच पक्ष ठामपणे उभा आहे, महाराष्ट्रात दोन प्रादेशिक आणि एका राष्ट्रीय पक्षाची मोट बांधून भाजपविरुद्ध लढाई केली जाते. त्यातही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष कधी नव्हे एवढे शक्तिहीन झालेले आहेत, त्यामुळे २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला खरेच टक्कर द्यायची असेल तर या तिन्ही पक्षांना खूप मोठी पूर्वतयारी करावी लागेल.
भाजपसारख्या महाबलीला रोखण्याची ताकद महाविकास आघाडीत आहे असे आजतरी वाटत नाही. महाविकास आघाडी भविष्यात एकत्रितपणे लढली तरच काही भवितव्य असेल. एकट्याच्या बळावर भाजपला पराभूत करू शकेल असा एकही ‘थलपती’ महाराष्ट्राच्या राजकारणात नाही.
आमदारकी नाकारून पूर्णपणे पक्षप्रमुखाच्या भूमिकेत जायचे उद्धव ठाकरे यांनी ठरविले असले तरी आधीच त्यांच्या पक्षात पडलेली फूट, मातोश्रीचा कमी झालेला दबदबा या पार्श्वभूमीवर ते थलपती ठरू शकतील असे आजतरी दिसत नाही. प्रादेशिक, भाषिक अस्मिता चेतवत प्रादेशिक पक्ष मोठे होत असतात. ही अस्मिता खूपच टोकदार असते तेव्हा त्यांचा प्रभाव कमालीचा वाढतो; महाराष्ट्रात आज त्यासाठीचे पोषक वातावरणही दिसत नाही. भाजपला भविष्यात पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातील विरोधकांकडे एकही करिष्माई चेहरा नाही. ईव्हीएम अन् एसआयआरवर खापर फोडूनच भाजपच्या विजयाची चिकित्सा काँग्रेस, उद्धवसेना करत असतील आणि भाजपच्या विजयाची खरी कारणे शोधून त्यांना रणनीतीच आखायची नसेल तर देवच त्यांचे भले करो!
राजकारणात ‘थलपती’ फक्त पदाने तयार होत नाही. तो संघर्षातून घडतो, जनतेच्या विश्वासातून उभा राहतो आणि संकटाच्या क्षणी लोकांच्या मनात आशा निर्माण करतो. महाराष्ट्रात आज असा एकही निर्विवाद चेहरा दिसत नाही, हीच विरोधकांची सर्वात मोठी शोकांतिका आहे.
आणखी एक गोष्ट विरोधकांनी लक्षात घ्यायला हवी — पराभवाची कारणे जर नेहमीच ईव्हीएम, यंत्रणा किंवा कटकारस्थानांमध्ये शोधली गेली, तर आत्मपरीक्षण कधीच होणार नाही. मशीनच्या मदतीने निवडणुका जिंकता येत नाहीत; त्यासाठी मने जिंकावी लागतात. भाजपने हे ओळखले आहे. विरोधक अजूनही पराभवाचे सांत्वन शोधत आहेत.