होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 07:44 IST2026-05-08T07:41:29+5:302026-05-08T07:44:22+5:30
संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) किनाऱ्याजवळून जात असताना या जहाजाने आपल्या डेकवर आग लागल्याबद्दल आपत्कालीन संदेश पाठवले होते.

होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
तेहरान - होर्मुझ सामुद्रधुनीजवळ चीनच्या मालकीच्या तेल टँकरवर हल्ला झाला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावात एखाद्या चिनी टँकरवर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे. चीनइराणला आपला मित्र मानतो. अमेरिकेविरोधात युद्धात चीनने आतापर्यंत इराणला साथ दिली. त्यामुळे हा हल्ला गांभीर्याने पाहिला जात आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच हा हल्ला झाला. ज्यादिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गात अडकलेल्या जहाजांसाठी प्रोजेक्ट फ्रीडमची घोषणा केली होती तेव्हा या हल्ल्याची माहिती समोर आली.
चिनी जहाजावर पहिल्यांदा हल्ला
प्रोजेक्ट फ्रीडमच्या घोषणेनंतर काही तासांनीच ट्रम्प यांनी ही मोहीम तात्काळ थांबवली. मात्र इराणने होर्मुझमध्ये जहाजे आणि शेजारील देशांना टार्गेट करत ड्रोन, मिसाइल हल्ले सुरूच ठेवले होते. त्यात चिनी जहाजावर हल्ला करत तेल टँकरला टार्गेट करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे चिनी माध्यमांनी सांगितले. जहाजावरून आलेल्या फोटोंमध्ये डेक जळताना दिसत आहे. या हल्ल्यात जहाजावरील कोणी कर्मचारी जखमी झाले आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालं नाही. सागरी सुरक्षा सूत्रांनी नुकसान झालेल्या जहाजाची ओळख मार्शल आयलंड्सचा ध्वज असलेले तेल आणि रासायनिक टँकर म्हणून पटवली आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) किनाऱ्याजवळून जात असताना या जहाजाने आपल्या डेकवर आग लागल्याबद्दल आपत्कालीन संदेश पाठवले होते.
होर्मुझच्या महत्त्वपूर्ण सामुद्रधुनीवर इराणचे हल्ले
होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक आहे. ज्यातून जगातील सुमारे २० टक्के तेल आणि गॅसचा पुरवठा होतो. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष सुरू झाल्यापासून हा महत्त्वपूर्ण जलमार्ग रोखला गेला आहे. इराणच्या सततच्या हल्ल्यांमुळे शेकडो जहाजे आणि सुमारे २०,००० खलाशी या सामुद्रधुनीमध्ये अडकून पडले आहेत.
अमेरिकेचा इराणवर हल्ला
या आठवड्याच्या सुरुवातीला बीजिंगमध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतल्यानंतर काही दिवसांतच हा हल्ला झाल्याचं समोर आले आहे. या बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंनी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यावर चर्चा केली. त्यातच अमेरिकेच्या लष्कराने ७ मे रोजी गुरुवारी झालेल्या इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणच्या लष्करी तळांवर हल्ला केल्याची बातमी आहे. एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या शस्त्रसंधीनंतर अमेरिकेने इराणवर केलेला हा पहिला थेट हल्ला आहे.
दरम्यान, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या तीन अमेरिकी विध्वंसक जहाजांवर इराणी सैन्याने ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि लहान बोटींनी हल्ला केला. ज्यामुळे अमेरिकी सैन्याला प्रत्युत्तर देत त्या नष्ट कराव्या लागल्या असं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले. बंदर अब्बास आणि केशम येथील इराणी लष्करी तळांवर हल्ला झाल्याचेही बोलले जाते. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे असं सांगत ट्रम्प यांनीही इराणला लवकरात लवकर करारावर स्वाक्षरी करण्याचा इशारा दिला आहे.