TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 08:59 IST2026-05-08T08:56:26+5:302026-05-08T08:59:40+5:30
Nashik TCS Case: नाशिकमधील TCS प्रकरण समोर आल्यापासून पोलीस निदा खानच्या शोधात होती. २५ मार्चपासून ती सातत्याने फरार होती.

TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
नाशिक - नाशिक शहरातील चर्चेत असणारं TCS धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणी मुख्य महिला आरोपी निदा खान हिला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मागील २५ दिवसांपासून निदा खान पोलिसांच्या नजरेतून वाचत छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात लपून बसली होती. या अटकेनंतर तिचा पहिला फोटो समोर आला आहे.
माहितीनुसार, निदा खान गेल्या काही दिवसांपासून कॅसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये राहत होती. विशेष म्हणजे तिच्यासोबत तिचे ४ नातेवाईकही फ्लॅटमध्ये सोबत राहायचे. पोलिसांना तिच्या लोकेशन बदलाची माहिती वेळोवेळी मिळायची परंतु प्रत्येक वेळी तपास यंत्रणेच्या तावडीतून वाचण्यात तिला यश येत होते. अखेर नाशिक क्राइम ब्रांच आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तिला ताब्यात घेण्यात आले. रात्री ११.३० वाजता पोलिसांच्या टीमने तिला अटक केली. या अटकेनंतर सर्वात आधी तिची मेडिकल चाचणी करण्यात आली. त्यानंतर ट्रांजिट वॉरंट प्रक्रियेत तिला संभाजीनगर कोर्टासमोर हजर केले. आता तिला नाशिकला घेऊन जात आहेत. जिथे तिला नाशिकच्या कोर्टासमोर हजर केले जाईल.
निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
२५ मार्चपासून निदा खान होती फरार
नाशिकमधील TCS प्रकरण समोर आल्यापासून पोलीस निदा खानच्या शोधात होती. २५ मार्चपासून ती सातत्याने फरार होती. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने तिचा शोध सुरू ठेवला होता. आरोपी निदा खान वारंवार तिचे लोकेशन बदलत होती. जवळच्या नातेवाईकांनी तिला लपवण्यात मदत केली होती. त्यातच अंतरिम जामिनासाठी तिने प्रयत्न सुरू केला होता. परंतु कोर्टाने तिला दिलासा दिला नाही. २ मे २०२६ रोजी नाशिक कोर्टाने तिची याचिका फेटाळली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या शोध मोहिमेला आणखी वेग दिला.
कोर्टात काय घडलं?
नाशिक रोड कोर्टात या प्रकरणाची सुनावणी महत्त्वाची मानली जाते. निदा खानच्या वकिलाकडून कोर्टात तिची बाजू मांडण्यात आली. २९ एप्रिलला इन कॅमेरा सुनावणी झाली होती. त्यावेळी एसआयटीकडून पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी तपास अधिकारी म्हणून कोर्टात बाजू मांडत निदा खानला अंतरिम जामीन देण्यास विरोध केला. आरोपीने पीडितेला विशिष्ट धार्मिक प्रथांकडे वळवण्याचा प्रयत्न केला, काही धार्मिक ॲप्स डाउनलोड करवून घेतले आणि अनेक लिंक्स पाठवल्या असं सरकारने न्यायालयात दावा केला. तपास यंत्रणा या प्रकरणातील कथित परदेशी संबंधांचीही चौकशी करत आहेत. कोर्टात मालेगाव आणि मलेशियाशी असलेल्या संबंधांचा उल्लेख करण्यात आला. सध्या डिजिटल रेकॉर्ड आणि संपर्कांचा तपास केला जात आहे.
दरम्यान, निदा खानच्या अटकेनंतर नाशिकपासून छत्रपती संभाजी नगरपर्यंत खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर या प्रकरणावर चर्चा सुरू आहे. तिच्या अटकेनंतर समोर आलेल्या फोटोवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आरोपीच्या चौकशीतून अनेक नवीन तपशील समोर येऊ शकतात. तिला पळण्यासाठी कोणी मदत केली, ती कोणाच्या संपर्कात होती आणि या नेटवर्कमध्ये इतर व्यक्तींचा सहभाग आहे का हे तपास यंत्रणा शोधण्याचा प्रयत्न करेल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.