शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 08:59 IST

1 / 7
Success Story: तुम्ही अनेकांच्या यशोगाथा ऐकल्या असतील. पण प्रतीक्षा तोंडवलकर यांची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. मुंबईत राहणाऱ्या प्रतीक्षा यांनी एकेकाळी भारतीय स्टेट बँकेत (SBI) सफाई कामगार म्हणून काम केलं.
2 / 7
केवळ ६५ रुपये महिना पगारावर त्यांनी बँकेतील फर्निचर आणि स्वच्छतागृहं साफ केली. मात्र, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पुढे याच बँकेत त्या सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) पदापर्यंत पोहोचल्या. १७ व्या वर्षी लग्न आणि २० व्या वर्षी पतीचं छत्र हरपणं, अशा अनेक संघर्षांना तोंड देत त्यांनी हे यशाचं शिखर गाठलंय.
3 / 7
प्रतीक्षा यांचा विवाह अवघ्या १७ व्या वर्षी सदाशिव कडू यांच्याशी झाला होता. आई-वडिलांच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना १० वीची परीक्षाही पूर्ण करता आली नव्हती. त्यांचे पती सदाशिव मुंबईत एसबीआयमध्ये 'बुकबाइंडर' म्हणून काम करत होते. दुर्दैवाने, एकदा गावी जात असताना झालेल्या अपघातात सदाशिव यांचा मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी प्रतीक्षा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला.
4 / 7
शिक्षणाची कमतरता असल्यामुळे प्रतीक्षा यांना चांगली नोकरी मिळणं कठीण होतं. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि स्वतःचं शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना एसबीआयमध्येच सफाई कामगार म्हणून काम करावं लागलं. स्वच्छतागृहे आणि बँकेतील फर्निचर साफ करून त्यांना महिन्याला ६०-६५ रुपये मिळत असत. मुलाचा सांभाळ करत त्यांनी दिवसरात्र कष्ट केले आणि मुलाचं पोट भरण्यासाठी आपल्या क्षमतेपेक्षा जास्त मेहनत घेतली.
5 / 7
प्रतीक्षा यांनी कठीण परिस्थितीतही हार मानली नाही. परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी पुन्हा शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील विक्रोळी येथील एका नाईट कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर दुसऱ्या एका नाईट कॉलेजमधून मानसशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली. त्यांच्या कष्टाचं फळ म्हणून त्यांना सफाई कामगारावरून पदोन्नती देऊन 'मेसेंजर' बनवण्यात आले. जेव्हा त्यांनी पदवी पूर्ण केली, तेव्हा त्यांची बँकेत 'क्लर्क कम कॅशियर' म्हणून नियुक्ती झाली.
6 / 7
प्रतीक्षा यांनी १९९३ मध्ये प्रमोद तोंडवलकर यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यांचे पती अत्यंत आश्वासक स्वभावाचे होते. त्यांनी प्रतीक्षा यांना बँकेतील पदोन्नतीच्या परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिलं. प्रतीक्षा यांनीही या संधीचं सोनं केलं. आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्या आधी 'ट्रेनी ऑफिसर' झाल्या आणि त्यानंतर डीजीएम (DGM) आणि अखेर एजीएम (AGM) पदापर्यंत पोहोचल्या.
7 / 7
प्रतीक्षा तोंडवलकर यांचा हा यशाचा प्रवास आज लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येतं, हेच त्यांनी सिद्ध केले आहे.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाjobनोकरी