पावसाचे पाणी आता रस्त्यातच मुरणार; ‘नीरी’च्या वैज्ञानिकांचे जागतिक संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:45 AM2019-11-18T10:45:10+5:302019-11-18T10:46:02+5:30

रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता ते जमिनीत मुरवता येईल, यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्न करीत आहेत. मात्र राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) च्या वैज्ञानिकांनी ही कल्पना प्रत्यक्ष साकार केली आहे.

The rainwater will now merge in the road; Global research by Neeri's scientists | पावसाचे पाणी आता रस्त्यातच मुरणार; ‘नीरी’च्या वैज्ञानिकांचे जागतिक संशोधन

पावसाचे पाणी आता रस्त्यातच मुरणार; ‘नीरी’च्या वैज्ञानिकांचे जागतिक संशोधन

Next
ठळक मुद्दे‘फ्लाय अ‍ॅश’द्वारे काँक्रिटची निर्मिती 

निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता ते रस्त्यातच शोषले व त्यातून झिरपत जमिनीत मुरवता येईल, यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्न करीत आहेत. मात्र राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) च्या वैज्ञानिकांनी ही कल्पना प्रत्यक्ष साकार केली आहे. वीज प्रकल्पातील राखेपासून (फ्लाय अ‍ॅश) रस्ते निर्मितीसाठी उपयोगी काँक्रिट तयार करण्याचे तंत्रज्ञान नीरीने विकसित केले आहे. यातून मजबूत रस्ते तयार करता येतीलच, पण सोबत भूगर्भातील जलस्तर वाढेल आणि कॉर्बन फूटप्रींट घटण्यास मदत होईल, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
भूगर्भाच्या जलस्तरात सातत्याने होणारी घट आणि ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत वाढते कॉर्बन फूटप्रींटचे प्रमाण, हे मोठे आव्हान जगासमोर उभे ठाकले आहे. यासाठी जगभरात संशोधन चालले आहे. दुसरीकडे कोळसा विद्युत प्रकल्पातून निघणारी राख व त्याद्वारे होणाऱ्या प्रदूषणाची जीवघेणी समस्या निर्माण झाली आहे. निरुपयोगी असलेली आणि केवळ प्रदूषणास कारणीभूत असलेली वीज प्रकल्पाची राख पोरस काँक्रिट म्हणून उपयोगात येऊ शकते का, यावरही मोठ्या प्रमाणात संशोधन जगात केले जात आहे. बांधकामाच्या विटा व इतर वस्तू निर्मितीचे प्रयत्न चालले आहेत पण यात हवे तसे यश मिळत नव्हते. कारण त्यात सिमेंटसारखी मजबुती येत नव्हती. मात्र नीरीच्या संशोधकांनी ही मजबुती मिळविल्याचा दावा केला आहे. नीरीचे प्रधान वैज्ञानिक आणि या प्रकल्पाचे संयोजक डॉ. अवनीश अंशुल यांनी या ‘फ्लाय अ‍ॅश बेस्ड हाय स्ट्रेन्थ परवियस काँक्रिट’ विषयी माहिती दिली. आतापर्यंत फ्लायअ‍ॅशमध्ये अल्कलीचे मिश्रणाचा प्रयत्न चालला होता. पण अल्कली धोकादायक असल्याने कमर्शियल वापर शक्य झाला नाही. रस्ते निर्मितीसाठी काँक्रिटची क्षमता ३० मेगापिक्सलपर्यंत असणे आवश्यक आहे. मात्र आतापर्यंत ही क्षमता १८ मेगापिक्सलच्यावर आणणे शक्य झाले नाही. मात्र नीरीमध्ये वेगवेगळ््या कंपोनन्टचा उपयोग करून स्मार्ट जीओ पॉलिमर तंत्राने यापेक्षा अधिक क्षमतेचे पोरस काँक्रिट तयार केल्याचे त्यांनी सांगितले.
नीरीमध्ये या पोरस काँक्रिटचा वापर करून एक मोठे स्ट्रक्चर तयार करण्यात आले असून ते यशस्वीपणे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यात सिमेंटपेक्षा चांगली गुणवत्ता आहे.
नवनिर्मितीनंतर सिमेंट रस्त्यांच्या मजबुतीसाठी २८ दिवस वाट पहावी लागते व भरपूर पाणी द्यावे लागते. मात्र फ्लाय अ‍ॅशच्या पोरस काँक्रिटवर पाणी टाकण्याची गरज नाही व सात दिवसात रस्ता उपयोगासाठी तयार होतो.पावसाचे पाणी शोषून जमिनीत मुरवणार
या रस्त्याचे आयुष्यमान सिमेंट रस्त्याएवढेच राहील. रस्त्याची क्षमता त्या प्रदेशातील जमिनीचा प्रकार व वातावरणावर अवलंबून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पावसाचे पाणी शोषून जमिनीत मुरत असल्याने जलस्तर वाढीस मदत होते. यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे उद्दिष्ट यशस्वी झाल्याचे सांगत फ्लायअ‍ॅश काँक्रिट रस्त्यामुळे कार्बनचे प्रदूषण कमी करण्यातही प्रभावी ठरणार असल्याचा दावा डॉ. अंशुल यांनी केला. फ्लाय अ‍ॅशचा रस्ता प्रत्यक्ष साकार करण्यासाठी एनटीपीसी, इतर शासकीय एजन्सी व सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना भेटून हा प्रकल्प त्यांच्यासमोर सादर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोठ्या प्रमाणात उपलब्ध
देशभरातील वीज प्रकल्पांच्याजवळ लाखो टन फ्लाय अ‍ॅश जमा आहे. त्यामुळे उपलब्धता कमी पडण्याची शक्यता नाही. किमान प्रकल्पाच्या आसपासच्या भागात असे रस्ते तयार करता येईल, असा विश्वास डॉ. अंशुल यांनी व्यक्त केला. फ्लाय अ‍ॅश काँक्रिट सिमेंटचा सर्वात मोठा पर्याय म्हणून समोर येईल. शिवाय सिमेंट किंवा डांबरीकरणाच्या रस्त्यांपेक्षा फ्लाय अ‍ॅश काँक्रिटच्या रस्त्यांना अत्यंत कमी खर्च लागत असल्याची शक्यता डॉ. अंशुल यांनी व्यक्त केली.

अपघातात जीवितहानी टळेल?
उपयुक्त फ्लाय अ‍ॅश फ्लाय अ‍ॅश काँक्रिट सिमेंटप्रमाणे मजबूत असले तरी त्याप्रमाणे ठोस नाही. त्यामुळे अपघात झाल्यास जीवहानीचा धोका टळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाय पाणी शोषून घेत असल्याने पावसाळ्यात गाड्या स्लीप होउन पडण्याचा धोका कमी होईल व अपघाताचे प्रमाण कमी होईल. गाड्यांच्या टायरचे घर्षण कमी होणार असल्याने त्यांचे आयुर्मान वाढेल. या सर्व शक्यतांवर आताच दावा करता येत नाही, मात्र एक टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून संशोधन केले जात असल्याचे डॉ. अंशुल यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.

फ्लाय अ‍ॅशच्या प्रदूषणापासून मिळेल सुटका
विद्युत प्रकल्पातून निघणारी राख ही प्रकल्प असलेल्या नागरिकांसाठी, शेतीसाठी जीवघेणी समस्या आहे. ही राख पिकांना नुकसानकारक आहे. शिवाय हवेत उडणारे धुलिकणांचे घातक घटक नागरिकांना लंग कॅन्सर, अस्थमा, एलर्जी आदी आजारासाठी कारणीभूत ठरणारे आहेत. ही उडणारी राख नियंत्रित करणे समस्या आहे आणि डिस्पोज करण्यासाठी कोट्यवर्धीचा खर्च करावा लागतो. शिवाय वाहून नेणेही कठीण आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी ही राख वापरली गेली तर प्रदूषणापासून सुटका मिळेल, असा दावा करण्यात येत आहे.

Web Title: The rainwater will now merge in the road; Global research by Neeri's scientists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस