कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 16:21 IST2026-04-15T16:14:50+5:302026-04-15T16:21:40+5:30
"इस्लामाबादमध्येच राहा, मोठी बातमी मिळणार!" डोनाल्ड ट्रम्प यांचा महिला पत्रकाराला थेट फोन; इराणसोबतच्या कराराबाबत केला खुलासा!

कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले..
जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिका आणि इराण यांच्यातील 'पीस डील'बाबत एक अत्यंत रंजक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका महिला पत्रकाराला स्वतः फोन करून इस्लामाबाद न सोडण्याचा सल्ला दिला आहे. "तुम्ही तिथेच थांबा, कारण पुढच्या ४८ तासांत इराणसोबत महत्त्वाची बैठक होऊ शकते," असे ट्रम्प यांनी या पत्रकाराला सांगितले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
कोण आहे ती महिला पत्रकार?
ज्या पत्रकाराला राष्ट्राध्यक्षांनी फोन केला, तिचे नाव आहे कॅटलिन डूर्नबोस. कॅटलिन सध्या 'न्यूयॉर्क पोस्ट'मध्ये परराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडींच्या प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्या व्हाईट हाऊसचे रिपोर्टिंगही करतात. बीबीसी उर्दूशी बोलताना कॅटलिन यांनी सांगितले की, "माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या राष्ट्राध्यक्षांनी मला थेट फोन केला. मी इस्लामाबादमधील कव्हरेज संपवून निघण्याच्या तयारीत होते, पण ट्रम्प यांच्या फोननंतर मी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला आहे."
कॅटलिन यांची कारकीर्द
कॅटलिन या केवळ सामान्य पत्रकार नसून त्यांनी पत्रकारितेतील सर्वोच्च मानला जाणारा 'पुलित्झर पुरस्कार' पटकावला आहे. केयू युनिव्हर्सिटीतून पदवी आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सस मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या कॅटलिन यांना याच वर्षी अमेरिकेचा प्रतिष्ठित 'कोल्विन पुरस्कार'ही देण्यात आला आहे.
बैठकीसाठी इस्लामाबादचीच निवड का?
कॅटलिन यांनी जेव्हा ट्रम्प यांना विचारले की, दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा इस्लामाबादचीच निवड का केली? त्यावर ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, "ज्या देशांचा या युद्धाशी काहीही संबंध नाही, अशा देशांची निवड आम्ही का करावी? पाकिस्तान हा इराणचा शेजारी देश आहे." तसेच ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांचेही कौतुक केले. मुनीर अमेरिकेसोबत कधीही चुकीचे वागणार नाहीत, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.
मुद्दा फक्त अण्वस्त्रांचा!
या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू काय असेल, हे सांगताना ट्रम्प म्हणाले, "मला फक्त इतकंच हवं आहे की, इराणकडे कधीही अण्वस्त्रे नसावीत. आमचा करार फक्त याच मुद्द्यावर केंद्रित आहे. बाकीच्या गोष्टी गौण आहेत." रिपोर्ट्सनुसार, १८ किंवा १९ एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता कराराची दुसरी फेरी पार पडू शकते.