प्रिंसने दिले संकेत; ट्रेनमधून गांजा जप्त, गोंडवाना एक्सप्रेसमध्ये कारवाई

By नरेश डोंगरे | Updated: June 23, 2025 20:59 IST2025-06-23T20:58:34+5:302025-06-23T20:59:05+5:30

आरपीएफ क्राईम इंटेलिजन्स

prince gave a hint ganja seized from train action taken on gondwana express | प्रिंसने दिले संकेत; ट्रेनमधून गांजा जप्त, गोंडवाना एक्सप्रेसमध्ये कारवाई

प्रिंसने दिले संकेत; ट्रेनमधून गांजा जप्त, गोंडवाना एक्सप्रेसमध्ये कारवाई

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : गोंडवाना एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी करण्याचा डाव रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) प्रिन्स नामक श्वानाने उधळून लावला. प्रिंसच्या सतर्कतेमुळे गोंडवानाच्या बोगीतून ३.२ किलो गांजा जप्त करण्यात आला.

अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आरपीएफचे क्राईम इंटेलिजन्स युनिट रविवारी सकाळपासून रेल्वे स्थानकावर कारवाई करीत होते. ट्रेन नंबर १२४०९ गोंडवाना एक्सप्रेस रविवारी दुपारी १.४४ वाजता नागपूर स्थानकावर आली. फलाट क्रमांक ४ वर ही गाडी उभी असताना आरक्षक जसबीर सिंह, अजय सिंह, श्वान प्रिंस आणि त्याचा हॅण्डलर नीरज कुमार यांनी गाडीची तपासणी सुरू केली. एका बोगीत सिटखाली एक बॅग पडून दिसल्याने प्रिंसला संशय आला. त्याने ती बॅग बाहेर ओढली अन् हॅण्डलरचा संकेत दिले. त्यानुसार, आरपीएफ कर्मचाऱ्यांनी ही बॅग कुणाची आहे, अशी विचारणा डब्यातील प्रवाशांना केली. मात्र, कुणीही त्याबाबत माहिती दिली नाही.

परिणामी ही बेवारस बॅग खोलून बघितली असता त्यात एक पॅकेट दिसले. या बॅगमध्ये ३.२ किलो गांजा आढळला. बाजारात त्याची किंमत ४८ हजार रुपये आहे. तो जप्त करण्यात आला. आरपीएफचे सहायक सुरक्षा आयुक्त श्रीकुमार कुरूप यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफने ही कारवाई करून तपास आणि गांजा लोहमार्ग पोलिसांना सोपविला. पुढील तपास सुरू आहे.

'लोकमत'चे वृत्त अन् कारवाई!

विशेष उल्लेखनीय म्हणजे, रेल्वे गाड्यांमधून अंमली पदार्थासह विविध घटकाची होणारी तस्करी आणि तस्करांच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश करणारे वृत्त 'लोकमत'ने २१ जूनच्या अंकात प्रकाशित केले. त्यानंतर काही तासातच नागपूर स्थानकावर ही कारवाई करण्यात आली.

Web Title: prince gave a hint ganja seized from train action taken on gondwana express