National Epilepsy Day: 'Don't hide epilepsy, take timely medication' | राष्ट्रीय मिरगी दिन: 'मिरगी लपवू नका, वेळेवर औषधोपचार घ्या'
राष्ट्रीय मिरगी दिन: 'मिरगी लपवू नका, वेळेवर औषधोपचार घ्या'

नागपूर : ज्युलियस सिझर, चार्ल्स डिकन, नेपोलियन, वॅन गॉग, अल्फ्रेड नोबेल, अगाथा क्रिस्टी, लुई कॅरॉल, टोनी ग्रेग, क्रिकेटर जॉन्टी गेड्स जगातील या प्रसिद्ध लोकांना मिरगीचा (फिट येणे) आजार होता. त्यांनी या आजारावर यशस्वी मात केली. यामुळे मिरगीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. मिरगी किंवा अ‍ॅपिलेप्सी असल्यास किंवा त्याचा संशय असल्यास लपवू नका, योग्य डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घ्या. नियमीत आणि योग्य औषधोपचार घेतल्यास हा रोग बरा होतो, असा सल्ला प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट व ट्रॉपीकल न्यूरॉलाजीचे जागतिक अध्यक्ष डॉ. मेश्राम यांनी दिला.

१७ नोव्हेंबर हा दिवस राष्टÑीय मिरगी दिन म्हणून पाळला जातो, त्या निमित्ताने डॉ. मेश्राम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जगात पाच कोटींपेक्षा जास्त लोक मिरगीच्या आजाराने पिडीत आहेत. दरवर्षी यामध्ये २४ लाख रुग्णांची भर पडते. भारतामध्ये साधारण १ कोटी २० लाख लोक मिरगीने ग्रस्त आहेत. ८० टक्के लोक हे गरीब आणि मध्यम आर्थिक संपन्न असलेल्या देशांमध्ये आढळून येतात. या आजाराचे योग्य निदान होणे अतिशय आवश्यक आहे. कारण, मिरगी सारखी लक्षणे असणारे परंतु मिरगी नसणारेही काही आजार आहेत.
परत-परत मिरगीचे अटॅक येण्याचे कारण वेगवेगळे असू शकतात. रुग्ण औषध घेत नसेल, किंवा आपला आजार, त्रास कमी झाला असे समजून औषधे घेण्याचे टाळत असेल तर ते धोकादायक ठरू शकते. घरी कार्यक्रम असल्यास किंवा सणवार असल्यास मिरगी असणाऱ्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवाळीच्या दिवसांत हवा प्रदूषित होते, आवाजाचे प्रदूषण वाढते, आहारात बदल होत असल्यानेही अटॅक येण्याचे शक्यता किंवा प्रमाण वाढते. झोप कमी होण्यामुळे अटॅक येण्याचा धोका वाढतो.

योग्य औषधोपचाराने ८० टक्के आजारा बरा होतो
मागील काही वर्षांमध्ये बरेच नवीन संशोधन झाले. काही शोध सुरू आहेत. नवीन औषधे आलीत. या औषधांमध्ये ‘साईड इफेक्ट’ही कमी आहेत. ज्या रुग्णांमध्ये झटके थांबत नाही त्यांच्यातील एक व दोन टक्के रुग्णांमध्ये शस्त्रक्रियांचा पर्याय असतो. योग्य डॉक्टराचा सल्ला, योग्य आहार, नियमीत औषधोपचाराने ८० टक्के रुग्णांमध्ये मिरगीचा आजार बरा होऊ शकतो आणि ते सामान्य जीवन जगू शकतात, असेही डॉ. मेश्राम म्हणाले.

Web Title: National Epilepsy Day: 'Don't hide epilepsy, take timely medication'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.