Nagpur News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. नागपूर महापालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाला आहे. काँग्रेस नेते आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात पुन्हा एकदा काँग्रेस या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. तर दुसरीकडे नागपुरात भाजपची पकड मजबूत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या दिग्गज नेत्यांसह अर्धा डझन आमदारांची फौज मदतीला आहे. त्यामुळे आमदार ठाकरेंसाठी महापालिकेची लढाई सोपी नाही.
चंद्रशेखर बावनकुळेंनी १२० जागांचा आकडा आधीच जाहीर केला आहे. विधानसभेच्या निकालानंतर काँग्रेसचे संख्याबळ घसरले असले तरी कार्यकर्त्यांचे मनोबल खचलेले नाही. पक्षांतर्गत विरोधकांनीही ठाकरे हटाव चा हट्ट सोडून दिला आहे. पण ठाकरे यांना यावेळी 'लाडाच्या' कार्यकर्त्यापेक्षा 'हाडाच्या' कार्यकर्त्याला प्राधान्य द्यावे लागेल. ताकद निश्चितच वाढली आहे. पण या ताकदीचा पक्षाला किती फायदा होतो, याची परीक्षा या निवडणुकीत होणार आहे.
भंडाऱ्यातून गोंदियावर लक्ष.. पण 'लक्ष्य' कोणते?
भंडाऱ्यांत दोन सत्तारूढ पक्षांतील आमदारांमधील वाद सर्वश्रुत आहे. या वादाचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर होऊ नये यासाठी भाजपने सर्जरी करण्यास सुरुवात केली आहे.
गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या रूपाने राजकीय शल्यचिकित्सक यांच्यावर भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली. विशेष म्हणज ते गोंदिया, भंडारा जिल्ह्यासाठी भाजपचे संपर्कमंत्रीसुद्धा आहेत. भोयर यांची ही नियुक्ती भूतकाळापासून बोध घेत भविष्याचा वेध घेणारी वर्तमानातील कृती आहे.
गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यांत कुणाचे प्राबल्य आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेता या दोन्ही जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी व पक्षाची बांधणी करण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेली ही राजकीय सर्जरी आहे. त्यामुळे भंडाऱ्यांतून गोंदियावर लक्ष ठेवताना ते कोणते 'लक्ष्य' गाठतात याचीच चर्चा सुरू झाली आहे.