Nagpur Crime: नागपुरात खळबळ ! आई अन् विवाहित मुलीचा गळफास; दोन महिन्यापूर्वी मुलीच्या बाळाचा झाला होता मृत्यू
By दयानंद पाईकराव | Updated: May 2, 2026 19:15 IST2026-05-02T19:14:09+5:302026-05-02T19:15:34+5:30
Nagpur : विवाहित मुलीने व तिच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे व्यंकटेशनगर परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी दोघींनी सुसाईड नोट लिहून आमच्यावर भंडारातील मौदा येथे अंत्यसंस्कार करण्यात यावे, असे नमूद केले.

Nagpur Crime: Mother and married daughter hang themselves; The daughter's baby had died two months ago
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विवाहित मुलीने व तिच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे व्यंकटेशनगर परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी दोघींनी सुसाईड नोट लिहून आमच्यावर भंडारातील मौदा येथे अंत्यसंस्कार करण्यात यावे, असे नमूद केले. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. आत्महत्या केलेल्या मुलीला दोन महिन्यापूर्वी बाळ होऊन त्याचा मृत्यू झाला होता.
संगीता श्रीराम ढबाले (५२, रा. व्यंकटेशनगर) असे आत्महत्या केलेल्या आईचे तर आकांक्षा लोकेश ब्रह्मे (२९, रा. ओमनगर सक्करदरा) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. नंदनवन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगीता या शिक्षिका होत्या. तर आकांक्षा बॅंकेत नोकरी करीत होत्या. आकांक्षा यांना दोन महिन्यापूर्वी मुलगी झाली होती. परंतु जन्मानंतर मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या आपली आई संगीता यांच्याकडे आराम करण्यासाठी व्यंकटेशनगर येथे माहेरी गेल्या होत्या.
दोन महिन्यांपासून आकांक्षा तिची आई संगीता यांच्याकडे राहत होती. शुक्रवारी १ मे २०२६ रोजी आकांक्षाचे पती लोकेश सुधाकर ब्रह्मे (३०) हे घरी आले. त्यांनी दार ठोकूनही आतुन कोणीच प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी खिडकीतून पाहिले असता त्यांना आपली पत्नी व सासु गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यांनी शेजारी व नातेवाईकांना बोलावले. दार तोडून त्यांनी आकांक्षाला खाली उतरविले. त्यानंतर नंदनवन पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. नंदनवन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलाश देशमाने यांना माहिती मिळताच नंदनवन पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविले. दरम्यान आत्महत्येपूर्वी आई व मुलीने सुसाईड नोट लिहून त्यात आमच्या आत्महत्येबाबत कोणालाच दोषी ठरवू नये, असा उल्लेख केल्याची माहिती नंदनवन पोलिसांनी दिली आहे.
पतीच्या छळामुळे गळफास घेतल्याचा आरोप
आकांक्षाच्या वडिलांचा १० वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी तिचे लोकेश सोबत लग्न झाले. परंतु आकांक्षाचे मावसभाऊ विशाल सोनटक्के यांनी आकांक्षाचा पती लोकेश संपत्तीच्या वादातून तिचा छळ करीत होता. त्या छळातूनच मावशी व आकांक्षाने आत्महत्या केली, असा आरोप केला आहे. दरम्यान सुसाईड नोटमध्ये दोघींनी आमचा अंत्यसंस्कार भंडारातील मौदा येथे वडिलांवर अंत्यसंस्कार केले त्या ठिकाणी करण्याबाबत उल्लेख केला आहे.