LPG Crisis: हॉटेल आणि उद्योगांसाठी 'गॅस' बंद! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; केवळ घरगुती वापरासाठीच मिळणार एलपीजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 05:32 IST2026-03-07T05:31:54+5:302026-03-07T05:32:12+5:30
LPG Gas Shortage due to War :

LPG Crisis: हॉटेल आणि उद्योगांसाठी 'गॅस' बंद! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; केवळ घरगुती वापरासाठीच मिळणार एलपीजी
- आशिष रॉय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युद्धामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती पाहता, केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना एलपीजी सिलिंडर देण्यावर बंदी घातली. आता हा गॅस केवळ घरगुती वापरासाठीच पुरवण्यात येईल. या गॅसचा पुरवठा केवळ सरकारी कंपन्यांद्वारेच करता येणार आहे, असा आदेश केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने काढला आहे.
घरगुती सिलिंडरचा तुटवडा
एकीकडे व्यावसायिक गॅस बंद झाला असताना, दुसरीकडे घरगुती ग्राहकांनाही वेळेवर सिलिंडर मिळेनासे झाले आहेत. गॅस एजन्सीकडून ग्राहकांना पुढील महिनाभर सिलिंडर मिळणार नाही, असे सांगितले जात आहे. यामुळे गॅसचा काळाबाजार वाढण्याची भीती आहे.
केंद्र सरकारने का घेतला निर्णय?
भारत बहुतेक एलपीजी आखाती देशांतून आयात करतो. भारतात काही प्रमाणात उत्पादन होत असले तरी ते अपुरे आहे. युद्धामुळे आयातीत अडथळे येत असल्याने व्यावसायिक वापराचा गॅस बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे तेल कंपन्यांतील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
हॉटेल, उद्योग बंद पडण्याची भीती
सीएनजीच्या बाबतीत परिस्थिती तुलनेने बरी म्हणावी अशी आहे. देशांतर्गत उत्पादनातूनच सीएनजीची गरज भागवली जात आहे. जेथे सीएनजी उपलब्ध आहे, तेथे एलपीजीऐवजी सीएनजीचा वापर उद्योगांनी सुरू केला आहे. मात्र, देशातील बहुतांश भागात सीएनजी नेटवर्क उपलब्ध नसल्याने त्या भागातील हॉटेल आणि उद्योग लवकरच बंद पडण्याची भीती आहे. या अडचणींमुळे आम्हाला मोठा फटका बसेल, असे सदर येथील बुलॉक कार्ट रेस्टॉरंटचे बलबीर सिंग वाधवा म्हणाले.