लोकमत स्पेशल: अनेक प्रांतातील आर्म डिलर, ड्रग पेडलर्सवर पाकिस्तानी गॅगस्टरचे जाळे; महाराष्ट्र एटीएसची कारवाई

By नरेश डोंगरे | Updated: May 14, 2026 23:37 IST2026-05-14T23:37:07+5:302026-05-14T23:37:07+5:30

शहजाद भट्टी आणि डोगरा गँगकडून अनेकांना खास ऑफर

lokmat special pakistani gangsters network on arms dealer drug peddlers in many provinces maharashtra ATS takes action | लोकमत स्पेशल: अनेक प्रांतातील आर्म डिलर, ड्रग पेडलर्सवर पाकिस्तानी गॅगस्टरचे जाळे; महाराष्ट्र एटीएसची कारवाई

लोकमत स्पेशल: अनेक प्रांतातील आर्म डिलर, ड्रग पेडलर्सवर पाकिस्तानी गॅगस्टरचे जाळे; महाराष्ट्र एटीएसची कारवाई

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : महाराष्ट्रासह देशातील विविध प्रांतात असलेल्या छोट्या मोठ्या आर्म डिलर, ड्रग पेडलर्स आणि अवैध धंद्यात गुंतलेल्या समाजकंटकांवर पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी तसेच डोगरा गँगने जाळे टाकले आहे. पुढे यांच्याकडूनच घातपात करवून घेण्याचे पाकिस्तानचे मनसुबे होते. संशयीतांना त्यासाठी खास ऑफर देण्यात आली होती, अशी माहिती आता पुढे आली आहे.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी राज्यात ठिकठिकाणी केलेल्या छापेमारीच्या पार्श्वभूमीवर, आज एटीएसच्या शिर्षस्थ सूत्रांकडून नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला ही माहिती मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यूपी एटीएसने बाराबंकी येथील दानियाल अशरफ तसेच कुशीनगरच्या कृष्णा मिश्रा यांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. या दोघांकडून तसेच त्यांच्या मोबाईल फोनमधून धक्कादायक माहितीवजा डिजिटल पुरावे मिळाले.

दरम्यान, दिल्ली पोलिस स्पेशल सेलने अलिकडेच अटक केलेल्या आठ संशयित दहशतवाद्यांशीसोबत अशरफ आणि मिश्रा संपर्कात होते, हेदेखिल पुढे आले. या माहितीतूनच पाकिस्तानचा गँगस्टर शाहजाद भट्टी आणि डोगरा गँग भारतातील विविध राज्यांमध्ये स्वतंत्र मॉड्यूल तयार करीत असल्याचे पुढे आले. परिणामी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि विविध राज्यांतील तपास यंत्रणा समन्वयाने या प्रकरणाचा तपास करू लागले.

या पार्श्वभूमीवर, बुधवारी राज्यात एटीएसने चांद्यापासून बांद्यापर्यंत ठिकठिकाणी छापेमारी करून महाराष्ट्रात साधारणत: ५५ ते ६० संशयीतांना आणि दुसऱ्या राज्यातील डझनभर संशयीतांना ताब्यात घेतले. यातील ३० ते ४० जण कोणत्या ना कोणत्या अवैध धंद्यात गुंतले असल्याची माहिती आहे.

खास सूत्रांच्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी काही देशी कट्टे विकणाऱ्या तर काही जण एमडीसारखे ड्रग्ज विकणाऱ्या रॅकेटशी कनेक्ट आहेत. काही गेमिंग अॅपच्या गोरखधंद्यात तर काही जण दुसऱ्या कोणत्या अवैध धंद्यात सहभागी आहेत. या सर्वांची कसून तपासणी सुरू आहे.

पाकिस्तानी हॅण्डलर्सकडून स्वप्न

या सर्वांना गँगस्टर भट्टी, डोगरा तसेच आयएसआयच्या पाकिस्तानी हॅण्डलर्सनी संपर्कासाठी खास टीप्स दिल्या आहेत. त्यांना बक्कळ पैसा आणि आलिशान जिवनाचेही स्वप्न दाखविण्यात आल्याची माहिती आहे. खास गोपनियता ही पहिली अट असल्याने हे मॉड्यूल एकमेकांशी थेट संपर्क न ठेवता केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत होते, असेही पुढे आले आहे.
 

Web Title: lokmat special pakistani gangsters network on arms dealer drug peddlers in many provinces maharashtra ATS takes action