जोशी म्हणाले, काही बोलणार नाही

By Admin | Updated: November 29, 2015 03:27 IST2015-11-29T03:27:24+5:302015-11-29T03:27:24+5:30

बिहार निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भाजपचे जेष्ठ नेते खा. डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आता मात्र मौन साधले आहे.

Joshi said no one will say anything | जोशी म्हणाले, काही बोलणार नाही

जोशी म्हणाले, काही बोलणार नाही

संघ स्वयंसेवकांना केले मार्गदर्शन : स्मृतिमंदिरात घालविला दिवस
नागपूर : बिहार निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भाजपचे जेष्ठ नेते खा. डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आता मात्र मौन साधले आहे. ‘लोकमत’ने त्यांची भेट घेतली असता, कोणत्याही राजकीय विषयावर मला भाष्य करायचे नाही असे म्हणत त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. डॉ.जोशी यांनी शनिवारी रेशीमबाग स्मृतिमंदिराला भेट दिली व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. ते दिवसभर स्मृतिमंदिरातच होते.
रेशीमबागेत संघाच्या वरिष्ठ स्वयंसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात डॉ.जोशी यांनी देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. एकात्म मानवतावाद आणि भारतीय दर्शन या विषयावर त्यांनी स्वयंसेवकांचे उद्बोधन केले. डॉ.जोशी सकाळी ११.३० च्या सुमारास स्मृतिमंदिरात पोहोचले व त्यानंतर ते सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंत तेथेच होते. तेथून ते एका खासगी हॉटेलकडे रवाना झाले. दरम्यान, सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी दोघेही नागपुरात नसल्यामुळे डॉ.जोशी हे संघ मुख्यालयात गेले नाही. परंतु रेशीमबागेत त्यांनी संघाचे काही पदाधिकारी व प्रचारकांशी संवाद साधला.
बिहार निवडणुकीच्या पराभवानंतर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह तीन नेत्यांनी काढलेल्या संयुक्त निवेदनात डॉ. जोशी यांनीही स्वाक्षरी करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर टीका केली होती. डॉ.जोशी यांची संघाशी जवळीक आहे व या पार्श्वभूमीवर त्यांची रेशीमबागला उपस्थिती महत्त्वाची मानली जात होती. सध्याच्या राजकीय घडामोडींवर त्यांचे मत जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांना रेशीमबागेतच गाठले. मी येथे कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी आलेलो नाही. त्यामुळे त्या विषयांवर भाष्य करणार नाही. हा माझा खासगी दौरा आहे व स्वयंसेवकांना मार्गदर्शन करायला आलो आहे. या दौऱ्याचा कोणीही आपल्या हिशेबाने अर्थ काढू नये, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)

स्वयंसेवकांना दिले आचार-विचारांचे मार्गदर्शन
संघाच्या शिबिरात डॉ.मुरली मनोहर जोशी यांनी स्वयंसेवकांना ‘एकात्म मानववाद व भारतीय दर्शन’ तसेच ‘वेद उपनिषद आणि षड्दर्शन’ यावर मार्गदर्शन केले. यावेळी इतिहासाचे विविध दाखले देत त्यांनी आजच्या काळात समाजात नीतिमत्ता व संस्कार यांचा प्रसार कसा व्हायला हवा यावर प्रकाश टाकला. शिवाय विविध क्षेत्रांत राजकारणाचा प्रभाव वाढत असताना आचार-विचारांची शुद्धतादेखील वाढणे आवश्यक असल्याच्या मुद्यावरदेखील त्यांनी भर दिला.

Web Title: Joshi said no one will say anything