-कमलेश वानखेडे, नागपूर नागपूर महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. प्रदेशाध्यक्षांनी दोन्ही नेत्यांचा एकेक स्वीकृत सदस्य घ्यायच्या सूचना दिल्या असताना आ. विकास ठाकरे यांनी दोन्ही स्वीकृत सदस्य स्वतःच्या मनाप्रमाणे केले. पक्षात एवढा अपमान होत असेल तर मला व माझ्या नगरसेवकांना भूमिका घ्यावी लागेल. मी पक्षदेखील सोडेल, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे.
स्वीकृत सदस्यासाठी नितीन राऊत यांच्याकडून माजी नगरसेवक सुरेश जग्यासी यांचे नाव समोर करण्यात आले होते. पण महापालिकेची निवडणूक लढलेल्या व पराभूत उमेदवाराची स्वीकृतपदी नियुक्ती नको, असे पत्र प्रदेश काँग्रेसने काढले. त्यामुळे राऊत यांनी बंडोपंत टेभुर्णे यांचे नाव समोर केले होते. मात्र, राऊत यांच्या कोट्यातून एकालाही स्वीकृतची संधी मिळाली नाही. यामुळे राऊत कमालीचे दुखावले असून, संतापले आहेत.
'संख्याबळ पक्षाचे आहे'
'लोकमत'शी बोलताना नितीन राऊत म्हणाले, 'आम्ही दोघेही आमदार आहोत. प्रदेशाध्यक्षांनी भूमिका घेतली होती की दोन्ही आमदारांना एकेक सदस्य द्यायचा. तुमच्याकडे संख्याबळ जरी असेल तरी ते पक्षाचे आहे. स्वीकृत सदस्य नियुक्तीचे परिपत्रक निघाले तरी मला कळविण्यात आले नाही.'
'मला बुधवारी सकाळी कळले. मी प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी बोललो. बंडोपंत टेंभुर्णे यांचे नाव पाठवले. ते कागदपत्र घेऊन तयार होते. मात्र, दिवसभर त्यांना फिरविण्यात आले. शेवटी दोन मिनिटांपूर्वी टेंभुर्णे यांना आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे नेण्यात आले. यावेळी इटनकर यांनी काँग्रेसकडून आधीच दोन अर्ज झाल्याचे सांगितले. आमचा 'प्री-प्लान' घात करण्यात आला', असा आरोप राऊत यांनी केला.
आंबेडकरी जनता धडा शिकवेल
'मी काँग्रेस पक्षात आयुष्य घालवले. उमेदवारांना ताकद दिली. लोकसभेत सर्वाधिक लीड उत्तर नागपुरातून दिली. मी प्रामाणिकपणे काम कारायचे व माझाच गळा घोटायचा, हे योग्य नाही. लोकशाही पाळल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षात हुकूमशाही सुरू आहे. आजवर चूप बसलो. पण आता नाही. आंबेडकरी जनता यांना धडा शिकवेल', असा इशारा राऊत यांनी दिला.
शहराध्यक्ष व विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा घ्या
'शहर काँग्रेसमध्ये आ. विकास ठाकरे यांचा मनमर्जी कारभार सुरू आहे. प्रदेशाध्यक्षांच्या सूचनाही मानायला ते तयार नाही. विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर हे त्यांच्या हातचे बाहुले आहेत. घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी व शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे व विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांचा राजीनामा घ्यावा', अशी मागणी नितीन राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्याकडे केली आहे.
Web Summary : Nitin Raut warns he might leave Congress due to unfair treatment regarding Nagpur municipal appointments. He accuses city president Vikas Thakare of disregarding party directives and favoring his own candidates, leading Raut to complain to the state president and threaten resignation.
Web Summary : नागपुर नगर निगम की नियुक्तियों में कथित अन्याय के कारण नितिन राऊत ने कांग्रेस छोड़ने की चेतावनी दी। उन्होंने शहर अध्यक्ष विकास ठाकरे पर पार्टी निर्देशों की अनदेखी करने और अपने उम्मीदवारों का पक्ष लेने का आरोप लगाया, जिससे राऊत ने प्रदेश अध्यक्ष से शिकायत की और इस्तीफे की धमकी दी।