बिहारच्या मुंगेर येथील सफिया सराय पोलीस ठाण्यात तैनात असलेला सब-इन्स्पेक्टर (SI) चंदन कुमार याला पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं. मात्र, लग्नानंतर चंदनचे एका महिला पोलीस उपनिरीक्षकाशी प्रेमसंबंध निर्माण झाले. जेव्हा पत्नी या संबंधांना विरोध करायची आणि त्या महिला अधिकाऱ्यापासून दूर राहण्यास सांगायची, तेव्हा दोघांमध्ये कडाक्याची भांडणं होत असत. पतीने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याने पत्नीचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचं भासवण्यात आलं, मात्र कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, चंदननेच आपल्या सरकारी रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून पत्नीची हत्या केली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा हुंडाबळी आणि हत्या या दोन्ही अँगलने तपास करत आहेत.
मृत्यू झालेल्या महिलेचं नाव मधू कुमारी असं आहे. मधूचे वडील आणि आई यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभ्यासादरम्यानच चंदन आणि मधू एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मधुच्या आग्रहामुळे कुटुंबीयांनी आंतरजातीय विवाहास संमती दिली आणि ७ फेब्रुवारी २०२५ रोजी दोघांचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर काही दिवसातच त्यांना समजलं की, बरियारपूर येथे तैनात असलेल्या एका महिला सब-इन्स्पेक्टरसोबत चंदनचे संबंध आहेत. त्यावेळी चंदन देखील त्याच पोलीस ठाण्यात कार्यरत होता. जेव्हा मधू त्याला त्या महिलेपासून दूर राहण्यास सांगायची, तेव्हा त्यांच्यात वारंवार वाद व्हायचे.
काही महिन्यांपूर्वी संबंधित महिलेची दुसऱ्या पोलीस ठाण्यात बदली झाली, तर चंदनची बदली सफियासराय येथे झाली. तीन महिन्यांपूर्वी मधू आपल्या माहेरून पतीसोबत राहण्यासाठी सफियासराय येथे आली होती. शनिवारी पुन्हा एकदा त्यांच्यात जोरदार भांडण झालं आणि सायंकाळी ही घटना घडली. कुटुंबीयांचा थेट आरोप आहे की, महिला सब-इन्स्पेक्टरशी असलेल्या संबंधांमुळेच चंदनने आपल्या पत्नीचा काटा काढला. त्यांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सफियासराय परिसरातील एका भाड्याच्या घरात सब-इन्स्पेक्टरच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी लागल्याने २९ वर्षीय मधु कुमारीचा मृत्यू झाला. सुरुवातीला मधुने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं, पण नातेवाईकांच्या आरोपांनंतर प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. पोलिसांनी मधूचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला असून, आरोपी चंदन कुमारला बेड्या ठोकल्या आहेत.