देशातील सर्वांत गजबजलेल्या दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एक मोठी दुर्घटना घडता-घडता टळली. धावपट्टीवर विमाने वळवत असताना स्पाइसजेट आणि अकासा एअरची दोन विमाने एकमेकांना घासल्याने मोठा गोंधळ उडाला. या अपघातात दोन्ही विमानांचे नुकसान झाले असून सुदैवाने सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.
नेमकं काय घडलं?
स्पाइसजेटचे 'बी७३७-७००' हे विमान उड्डाणाच्या तयारीत असताना टॅक्सीइंग करत होते. त्याच वेळी तिथे स्थिर उभ्या असलेल्या अकासा एअरच्या विमानाला स्पाइसजेटच्या विमानाचा धक्का लागला. ही टक्कर इतकी जोरात होती की, स्पाइसजेटच्या उजव्या बाजूचा 'विंगलेट' अर्थात पंखाचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. तर दुसरीकडे, अकासा एअरच्या विमानाचा 'हॉरिझॉन्टल स्टेबलायझर' (शेपटाकडील भाग) निकामी झाला आहे.
प्रवाशांना बसला मोठा झटका
या अपघातानंतर दोन्ही विमाने तातडीने ग्राऊंड करण्यात आली असून ती ऑपरेशनमधून बाहेर काढली आहेत. अकासा एअरचे विमान दिल्लीहून हैदराबादला (QP 1406) जाण्यासाठी सज्ज होते. अकासा एअरच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "आमचे विमान जागेवर स्थिर उभे असताना दुसऱ्या विमानाने त्याला धडक दिली. सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवण्यात आले असून, त्यांना हैदराबादला पोहोचवण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे."
तपासाचे आदेश
स्पाइसजेटने देखील या अपघाताला दुजोरा दिला असून त्यांचे विमान सध्या दिल्ली विमानतळावरच थांबवून ठेवण्यात आले आहे. विमानतळ प्राधिकरणाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, ही चूक पायलटची होती की ग्राऊंड स्टाफची, याचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, ऐन प्रवासाच्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.
Web Summary : A SpiceJet plane collided with a stationary Akasa Air aircraft at Delhi Airport. Both planes suffered damage, but all passengers and crew are safe. An investigation is underway to determine the cause.
Web Summary : दिल्ली हवाई अड्डे पर स्पाइसजेट का विमान खड़े अकासा एयर के विमान से टकरा गया। दोनों विमानों को नुकसान हुआ, लेकिन सभी यात्री और चालक दल सुरक्षित हैं। घटना की जांच जारी है।