Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार

५ एप्रिल रोजी झालेल्या CSK vs RCB सामन्यात स्टेडियममध्ये वाजवलेल्या इडली-डोसा गाण्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सने आरसीबीच्या वर्तणुकीवर बीसीसीआयकडे तक्रार केली असून सविस्तर माहितीसाठी वाचा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:55 IST

Open in App

आयपीएल २०२६ मधील 'सदर्न डर्बी' आता केवळ मैदानातच मर्यादित राहिलेली नाही. ५ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात मैदानाबाहेर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. स्टेडियममध्ये वाजवण्यात आलेल्या एका गाण्यामुळे चेन्नई संघाने संताप व्यक्त केला असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

नेमका वाद काय?५ एप्रिल रोजी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना झाला. चेन्नईचा आरोप आहे की, सामना सुरू असताना स्टेडियममध्ये एका गाण्याद्वारे त्यांच्या खेळाडूंची आणि तामिळ अस्मितेची थट्टा करण्यात आली. या गाण्यात 'इडली, डोसा, सांभार, चटणी' या शब्दांचा वापर करण्यात आला होता. हे गाणे केवळ मनोरंजनासाठी नसून, ते सीएसकेच्या खेळाडूंवर टीका करण्यासाठी किंवा त्यांना चिडवण्यासाठी वापरले गेल्याचा दावा चेन्नई व्यवस्थापनाने केला आहे.

CSK चे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनी यावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "सामान्यतः डीजे हे घरच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी असतात, पण चिन्नास्वामी स्टेडियममध्ये स्थिती वेगळी होती. आमच्या खेळाडूंविरुद्ध विशिष्ट टिप्पण्या करण्यात आल्या. त्यामुळेच आम्ही बीसीसीआयला पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे."

जितेश शर्माचा तो जुना व्हिडिओ पुन्हा चर्चेतया वादाची मुळे गेल्या वर्षीच्या एका घटनेत आहेत. गेल्या हंगामात आरसीबीने त्यांचा यष्टिरक्षक जितेश शर्मा याचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो हेच 'इडली-डोसा' गाणे गाताना दिसला होता. त्यावेळीही चेन्नईच्या चाहत्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केले होते. हे गाणे संगीतकार 'गाना अप्पू' यांनी तयार केले आहे.

मैदानावरील निकाल: आरसीबीची सरशीएकीकडे वाद सुरू असताना मैदानात मात्र आरसीबीने चेन्नईवर वर्चस्व गाजवले. टिम डेविडच्या वादळी ७० धावा (२५ चेंडू, ८ षटकार) आणि रजत पाटीदारच्या ४८ धावांच्या जोरावर आरसीबीने २५० धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ २०७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. या सामन्यात अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आयपीएलमध्ये आपले २०० बळी पूर्ण करण्याचा विक्रमही प्रस्थापित केला.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: 'Idli-Dosa' song sparks controversy; CSK complains against RCB.

Web Summary : CSK filed a complaint with BCCI after a song mocking South Indian culture was played during the RCB match. CSK alleges the song targeted their players. RCB won the match despite the controversy.
टॅग्स :आयपीएल २०२६चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर