पत्रकारांकडून मला नेहमीच प्रोत्साहन मिळाले

By Admin | Updated: December 20, 2015 03:02 IST2015-12-20T03:02:23+5:302015-12-20T03:02:23+5:30

काही पत्रकार स्वकर्तृत्वावर आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनाने समोर येतात. त्यांच्या शोधपत्रकारितेमुळे समाजाचे नुकसान थांबते आणि समाज उन्नत होतो.

I have always encouraged journalists | पत्रकारांकडून मला नेहमीच प्रोत्साहन मिळाले

पत्रकारांकडून मला नेहमीच प्रोत्साहन मिळाले

मुख्यमंत्री फडणवीस : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार
नागपूर : काही पत्रकार स्वकर्तृत्वावर आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनाने समोर येतात. त्यांच्या शोधपत्रकारितेमुळे समाजाचे नुकसान थांबते आणि समाज उन्नत होतो. विधानभवनात विरोधक म्हणून काम करताना एखादा मुद्दा मांडल्यावर तो मुद्दा योग्य पद्धतीने मांडल्याचे प्रोत्साहन मला अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी दिले. त्याचा मला लाभ झाला. मी केलेल्या चांगल्या कामाबद्दल नेहमीच पत्रकारांकडून मला प्रोत्साहन मिळाले, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि ट्रस्ट यांच्यावतीने राज्य अधिस्वीकृती मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल लोकमत मुंबईचे विशेष प्रतिनिधी यदु जोशी आणि ज्येष्ठ महिला संपादक राही भिडे यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र, ब्रम्हाशंकर त्रिपाठी, शिरीश बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कोमल ठाकरे यांनी तर आभार प्रदीप मैत्र यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: I have always encouraged journalists