नागपुरात गँगस्टरची पोलिसांकडून वरात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 04:02 PM2019-10-13T16:02:55+5:302019-10-13T16:14:24+5:30

उपराजधानीच्या गुन्हेगारी जगताचा डॉन म्हणून कुख्यात असलेला संतोष आंबेकर याची रविवारी दुपारी पोलिसांनी वरात काढली.

Gangster Ambekar arrested for duping 3 businessmen of Rs 5 crore in land deal | नागपुरात गँगस्टरची पोलिसांकडून वरात

नागपुरात गँगस्टरची पोलिसांकडून वरात

Next
ठळक मुद्देउपराजधानीच्या गुन्हेगारी जगताचा डॉन म्हणून कुख्यात असलेला संतोष आंबेकर याची रविवारी दुपारी पोलिसांनी वरात काढली.आंबेकर आज पोलिसांच्या गराड्यात चक्क टी शर्ट आणि हाफ पँटवर पायी चालत न्यायालयात पोहचला.शनिवारी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आंबेकरच्या मुसक्या बांधल्या.

नागपूर - उपराजधानीच्या गुन्हेगारी जगताचा डॉन म्हणून कुख्यात असलेला संतोष आंबेकर याची रविवारी दुपारी पोलिसांनी वरात काढली. नेत्याच्या थाटात कडक कपडे घालून आलिशान गाड्यांमध्ये, गुंडांच्या घोळक्यात फिरणारा आंबेकर आज मात्र पोलिसांच्या गराड्यात चक्क टी शर्ट आणि हाफ पँटवर पायी चालत न्यायालयात पोहचला. गुजरातमधील एका उद्योजकाला जमिनीच्या व्यवहारात फसवून त्यांच्याकडून ५ कोटी रुपये घेणाऱ्या कुख्यात आंबेकरने ही रक्कम हडपल्यानंतर त्यांना पुन्हा पिस्तुलाच्या धाकावर एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. शनिवारी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आंबेकरच्या मुसक्या बांधल्या.

गुजरातमधील उद्योजक जिगर पटेल मुंबईत आउटलेट सुरू करण्यासाठी जागा शोधत होते. त्यांना एक जागा आणि जागेची बनावट कागदपत्रे दाखविल्यानंतर पटेल यांनी आंबेकरशी सौदा पक्का केला. त्याला टोकण म्हणून  पटेल यांनी जून २०१८ मध्ये ५ कोटी रुपये दिले.  तेव्हापासून जागा मिळावी म्हणून पटेल प्रयत्नशील होते. ते आंबेकरला लवकरात लवकर विक्रीपत्र करून मागत होते तर वेगवेगळे कारणं सांगून आंबेकर त्यांना टाळत होता. संशय आल्यामुळे पटेल यांनी कागदपत्रांची शहानिशा केली असता दाखविलेली जमिन आंबेकरच्या नव्हे तर भलत्याच्याच मालकीची आहे आणि या जमिनीसोबत आंबेकरचा कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी आंबेकरला आपली रक्कम परत मागितली. ते त्यासाठी वारंवार नागपुरात येत होते. काही दिवसांपूर्वी ते असेच नागपुरात आले. ते सेंटर पॉईंटमध्ये पटेल थांबले होते. येथे आंबेकर पोहचला आणि त्याने ‘मी नागपूरचा डॉन आहे. दिलेले पाच कोटी आणि ती जागा विसरून जा’ असे म्हणत पिस्तुलाच्या धाकावर धमकी दिली. एवढेच नव्हे तर पुन्हा एक कोटींची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर जीवे ठार मारेन, अशी धमकीही दिली. 

पटेल यांनी गुजरातमधील उच्चपदस्थ सूत्रांच्या मदतीने पोलीस अधिकाऱ्यांना भेटून हा घटनाक्रम सांगितला. त्यामुळे शनिवारी सकाळी सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्याबाबत कमालीची गोपनियता बाळगून आंबेकरला दुपारी गुन्हे शाखेत बोलवून घेण्यात आले. या प्रकरणात आंबेकरची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली. तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पाहून पोलिसांनी त्याला वेगळळ्या पद्धतीने बोलते केले. त्याने गुन्ह्याची कबली देताच आंबेकरला अटक करण्यात आली. रविवारी दुपारी १ वाजता आंबेकरला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने त्याला कोर्टात हजर केले. पोलिसांनी त्याला गुन्हे शाखेतून आकाशवाणी चौकात आणले. तेथून त्याला वाहनातून उतरवून चक्क पायी न्यायालयात नेले. एखाद्या नेत्याप्रमाणे कडक इस्त्रीच्या कपड्यात आपल्या टोळीतील गुंडांच्या घोळक्यात फिरणारा आंबेकर पोलिसांच्या गराड्यात अनवानी आणि केवळ टी शर्ट आणि हाफ पँटवर अंग चोरून चालत होता. न्यायालयाने पोलीस आणि आंबेकरच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर, गुन्ह्याची उकल करण्यासाठी त्याला ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.  

 

Web Title: Gangster Ambekar arrested for duping 3 businessmen of Rs 5 crore in land deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.