भिवापूर : निसर्गाच्या लहरीपणाशी झुंजणाऱ्या बळीराजावर निसर्गाने नाही, तर मानवी निष्काळजीपणाने असा काही घाला घातला की, अवघ्या काही तासांत अर्धे गाव स्मशानवत झाले आहे. भिवापूरपासून १५ किमी अंतरावरील धामणगाव (विद्या मंदिर) येथे शनिवारी (दि.२) सायंकाळी ६:३० वाजता लागलेल्या भीषण आगीत तब्बल ५० हून अधिक घरे जळून खाक झाली. या आगीत अन्नाचा कण आणि अंगावरच्या कपड्यांनिशी अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावालगतच्या शेतात कुणीतरी कचरा जाळण्यासाठी वणवा पेटवला होता. दिवसभर धुमसत असलेल्या या आगीने सायंकाळी ६:३० च्या सुमारास रौद्र रूप धारण केले आणि वाऱ्याच्या वेगाने ही आग शेतालगत असलेल्या रुपेश रामटेके यांच्या घराला लागली. पाहता पाहता आगीच्या लोळांनी संपूर्ण वस्तीला आपल्या कवेत घेतले. घरांना लागून असलेली घरे आणि उन्हाळ्यामुळे वाळलेला पालापाचोळा यामुळे आगीने काही क्षणांतच तांडव सुरू केले.
ग्रामस्थांनी मिळेल त्या साहित्याने आणि पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र आगीच्या ज्वाळा इतक्या भयानक होत्या की कोणाचेच काही चालले नाही. 'घर वाचवा, जनावरे वाचवा' अशा आक्रोशाने आणि किंकाळ्यांनी संपूर्ण गाव हादरून गेले होते. आगीच्या या रौद्र विळख्यात अडकलेल्या दोन-चार मुक्या जनावरांचा जागीच कोळसा झाला. कुणाची सायकल, कुणाच्या दुचाकी तर कुणाचा हक्काचा ऑटो या आगीत लोखंडाचा सांगाडा बनला. संपूर्ण गावच आगीच्या भक्ष्यस्थानी पडते की काय, अशी भीती निर्माण झाल्याने गावात एकच हंबरडा फुटला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून भिवापूर, उमरेड, भीसी आणि शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातील भीसी, चिमूर येथून अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले.
ही वाहने घटनास्थळी पोहोचेपर्यंत निम्म्या गावाची राख झाली होती. रात्री ९:३० च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात काहीसे यश आले, पण तोपर्यंत ५० संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार सुधीर पारवे, राजू पारवे, रोहित पारवे, सभापती तुळशीदास श्रीरामे यांनी तातडीने धामणगाव गाठत, पीडितांना धीर दिला. मात्र, या आगीने सामान्य कुटुंबांच्या आयुष्याची जी राखरांगोळी केली आहे, ती भरून काढणे आता मोठे आव्हान आहे.
Web Summary : A devastating fire in Dhamangaon, near Bhivapur, consumed over 50 homes, leaving families destitute. Triggered by a carelessly lit field fire, the blaze quickly spread, engulfing homes and livestock. Firefighters eventually contained the inferno, but the damage is extensive, requiring significant recovery efforts.
Web Summary : भिवपुर के पास धामणगाँव में भीषण आग लगने से 50 से अधिक घर जलकर खाक हो गए, जिससे परिवार बेघर हो गए। लापरवाही से जलाई गई खेत की आग से फैली आग ने घरों और पशुधन को अपनी चपेट में ले लिया। दमकल कर्मियों ने आग पर काबू पा लिया, लेकिन नुकसान व्यापक है।