दिवंगत रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला अखेर मिळाली मदत; एक कोटींचा विमा सुपूर्द
By नरेश डोंगरे | Updated: May 19, 2026 19:49 IST2026-05-19T19:48:30+5:302026-05-19T19:49:06+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे : अधिकाऱ्यांचा पाठपुरावा पीडित कुटुंबियांसाठी ठरला आधार

Family of deceased railway employee finally gets help; Insurance of Rs 1 crore handed over
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यानागपूर विभागात कार्यरत असताना निधन झालेल्या एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम मिळावी म्हणून सलग आठ महिने संबंधित अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले. त्यामुळे शेवटी पीडित कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना रेल्वे सॅलरी पॅकेज योजनेअंतर्गत एक कोटी रुपयांच्या विमा रकमेचा धनादेश प्राप्त झाला.
विनीत यादव असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेच्या नैनपूर कार्यालयाअंतर्गत सेवारत होते. त्यांचे २१ ऑक्टोबर २०२५ ला निधन झाले. कर्ता कुटुंबप्रमूख निघून गेल्याने यादव कुटुंबीय वाऱ्यावर आल्यासारखे झाले होते. त्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता दपूम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक दीपककुमार गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भारत सरकारच्या रेल्वे सॅलरी पॅकेज योजनेअंतर्गत विमा संरक्षण योजनेचा लाभ तातडीने मिळवून देण्याचे आदेश दिले. त्यानुसार, रेल्वे अधिकाऱ्यांनी संबंधित विमा अधिकाऱ्यांकडे सलग आठ महिने पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले.
१६ मे २०२६ रोजी वरिष्ठ विभाग अभियंता (रेलपथ) कार्यालय, नैनपूर येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नैनपूर शाखेचे व्यवस्थापकांनी दिवंगत विनीत राजेंद्र प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये विमा रकमेचा धनादेश सुपूर्द केला. यामुळे यादव कुटुंबीयांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
आईवडील, कुटुंबीय भारावले
विमाच्या रकमेचा धनादेश विनित यादव यांच्या आई-वडिलांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी आईवडीलांसह यादव कुटुंबीयांना गलबलून आले. ही रक्कम लवकरात लवकर मिळावी म्हणून आवश्यक कागदपत्रे आणि औपचारिकता वेळेत पूर्ण करण्यासाठी दपूम रेल्वे प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. त्याबद्दल यादव कुटुंबियांनी अधिकाऱ्यांचे भरल्या डोळ्यांनी आभार मानले.