अखेरपर्यंत मिळाले नाही हॉस्पिटल अन् बेड, ॲम्ब्युलन्समध्येच उडाले प्राणपाखरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 09:57 PM2021-04-07T21:57:04+5:302021-04-07T22:00:00+5:30

Death by corona without hospital वाठोडा भागातील एका कोरोना संक्रमित ४० वर्षीय तरुणाचा मृत्यू हॉस्पिटल आणि बेड न मिळाल्याने ॲम्ब्यूलन्समध्येच झाला.

Didn't get hospital until the end | अखेरपर्यंत मिळाले नाही हॉस्पिटल अन् बेड, ॲम्ब्युलन्समध्येच उडाले प्राणपाखरू

अखेरपर्यंत मिळाले नाही हॉस्पिटल अन् बेड, ॲम्ब्युलन्समध्येच उडाले प्राणपाखरू

Next
ठळक मुद्दे कोरोना संक्रमणाची बीभत्सता : अंत्यसंस्काराला केवळ मनपाचे कर्मचारी, शेजारीही हळहळले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मृत्यू हा नवीन विषय नाही. अगदी गर्भावस्थेपासून ते वयाची शंभरी गाठलेल्या मृतांच्या प्रेताला चिताग्नी देण्याचा अनुभव हा जवळपास सगळ्यांना सारखाच आहे. मात्र, काही मृत्यू आणि त्याची बीभत्सता मन हेलावणारी असते. अशीच एक घटना समाजमनाला सुन्न करणारी मंगळवारी घडली. वाठोडा भागातील एका कोरोना संक्रमित ४० वर्षीय तरुणाचा मृत्यू हॉस्पिटल आणि बेड न मिळाल्याने ॲम्ब्यूलन्समध्येच झाला. लहानपणापासून सोबतीने खेळणाऱ्या, शिक्षण घेणाऱ्या, सुख-दु:खाच्या गोष्टीत सहभागी होणाऱ्या आपल्या सख्याच्या पार्थिवाला खांदाही देता आला नाही, ही कधीही न मिटणारी सल देऊन हा तरुण गेल्याने शेजाऱ्यांचे डोळेही ओलावले होते.

कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेने आपले रौद्र रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. या लाटेत आता वृद्धच नव्हे तर सुदृढ व तरुणही बळी पडत असल्याचे आकडे दररोज पुढे येत आहेत. संक्रमणाचा वेग इतका भयंकर आहे की शासकीयच नव्हे तर खासगी हॉस्पिटल्सही फुल्ल झाले आहेत. बेड्सची संख्या वाढवण्याचे प्रयत्न केले जात असताना, ही संख्याही तोकडी पडत आहे. सेवा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी पडायला लागली आहे. अशाच स्थितीत काही दिवसांपूर्वी वाठोडा परिसरात राहणारा हा तरुण आणि संपूर्ण कुटुंबीय संक्रमित झाले. ते घरीच विलगीकरणात होते. मात्र, मंगळवारी या तरुणाला श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला आणि प्रकृती ढासळली. अशा स्थितीत त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलाविण्यात आली. मेयो, मेडिकल, इतर शासकीय हॉस्पिटल्समध्ये गेले असता बेड्स रिकामे नसल्याने, ॲम्ब्युलन्सने आपला मोर्चा खासगी हॉस्पिटल्सकडे वळवला. मात्र, तेथेही तीच स्थती. अशा तऱ्हेने तीन, साडेतीन तास ॲम्ब्युलन्स हॉस्पिटल मिळेल, बेड मिळेल या आशेने फिरत होती. मात्र, ते मिळाले नाही आणि रस्त्यातच या तरुणाचा मृत्यू झाला. अखेर त्याचे पार्थिव घरी आणण्यात आले. मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. अशाच स्थितीत कुटुंबीयांनी त्याचे पार्थिव गुंडाळून ठेवले. रात्रभर कुटुंबीय पार्थिवाजवळ आणि शेजारी आपल्या घरूनच ही वेदना अनुभवत होते. कुटुंबीयांचा तो हंबरडा अनेक दिवस स्मरणात राहणार आहे. बुधवारी सकाळी मनपाचे चार कर्मचारी आले आणि तरुणाचा मृतदेह घेऊन निघून गेले. संक्रमित असल्याने ना घरचे जाऊ शकले ना शेजारी त्या पार्थिवाला अखेरचा खांदा देऊ शकले. सगळेच ओक्साबोक्सी रडत होते. जो तो त्या घराकडे टक लावून बसला होता. मात्र, नियतीपुढे सगळेच हतबल होते.

Web Title: Didn't get hospital until the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.