Contestants should respect the results of the examiner: Vilas Ujawane | परीक्षकांच्या निकालाचा स्पर्धकांनी सन्मान करावा : विलास उजवणे
परीक्षकांच्या निकालाचा स्पर्धकांनी सन्मान करावा : विलास उजवणे

ठळक मुद्देहौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाटकांची स्पर्धा होतेय, ही चांगली बाब आहे. स्पर्धेत सहभागी रंगकर्मींनी सादर केलेल्या नाटकांचा निकाल लावण्याची जबाबदारी परीक्षकांची आहे. जो काही निकाल लागेल, त्याचा सन्मान करून स्पर्धकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता डॉ. विलास उजवणे यांनी केले.
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात आयोजित ५९ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन उजवणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी महेश रायपूरकर, नाट्य परिषदेच्या महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक मालती भोंडे, सुरेश बारसे व विश्वास पांगळकर व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या नागपूर विभागीय सहसंचालिका खासनविस उपस्थित होते.
अध्यक्षस्थानाहून बोलताना प्रफुल्ल फरकसे यांनी रसिकांच्या अनुपस्थितीविषयी खेद व्यक्त केला. धनवटे रंगमंदिर असतानाच्या काळात रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आणि रंगकर्मींना दाद देत असत. तशी स्थिती आज दिसत नाही. दाद मिळाली नाही तर कलावंत घडणार नाही. त्यामुळे, रसिकांनी रंगकर्मींच्या कामाची दखल घेण्याचे आवाहन फरकसे यांनी यावेळी केले. संचालन स्पर्धेच्या समन्वयिका वैदेही चवरे-सोईतकर यांनी केले.

स्पर्धक, अध्यक्ष अन् प्रमुख पाहुणे
 स्पर्धेच्या उद्घाटनाला महानगर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते या स्पर्धेत स्पर्धक म्हणूनही सहभागी आहेत. त्यामुळे, त्यांच्या उपस्थितीवर काही जणांनी दबक्या आवाजात आक्षेपही घेतला. शिवाय, ते महानगर शाखेचे अध्यक्ष कधी झाले, असा संशयही उपस्थित करण्यात आला. त्यांचे स्वघोषित अध्यक्षपदाबाबत मध्यवर्तीकडून आक्षेपही घेण्यात आलेला आहे. त्यांच्यावर कारवाईची सुई लटकली असताना, अध्यक्ष या नात्याने ते कसे उपस्थित होते, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Web Title: Contestants should respect the results of the examiner: Vilas Ujawane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.