Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 21:34 IST2025-10-29T21:24:26+5:302025-10-29T21:34:33+5:30
Bacchu Kadu Morcha News: बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासह इतर मागण्यांसाठी महाएल्गार मोर्चा काढला असून, बुधवारी रात्री सरकारने दखल घेत मंत्र्यांना त्यांच्याशी चर्चा करायला पाठवले.

Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
Bacchu Kadu Morcha Update: शेतकरी कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असलेल्या बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांची सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मंत्री आशिष जयस्वाल, पंकज भोयर यांनी बच्चू कडू, अजित नवले, राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळाने चर्चेसाठी येण्याची विनंती केली. त्याला बच्चू कडू यांनी होकार दिला. चर्चा करून येईपर्यंत आंदोलकांना धक्का लागणार नाही, याची जबाबदारी सरकारची असेल, असे शेतकरी नेते शिष्टमंडळाला म्हणाले. त्याला सरकारने हमी दिली.
मंत्री आशिष जयस्वाल, मंत्री पंकज भोयर यांनी बच्चू कडू, अजित नवले, राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा केली. सरकारच्या शिष्टमंडळाने आंदोलक नेत्यांना मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईला बैठकीला येण्याची विनंती केली.
आम्हाला चुना लावला तर सोडणार नाही, सरकारला इशारा
शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर बच्चू कडू यांनी उपस्थित आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर बच्चू कडू म्हणाले की, आपल्याला चर्चा करावी लागेल. चर्चा केल्याशिवाय तोडगा निघणार नाही. मी मंत्री म्हणून काम केले आहे. चर्चेशिवाय मार्ग निघणार नाही. पण, आपल्याला पूर्ण तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही. जर तोडगा निघाला नाही किंवा आम्हाला चुना लावण्याचा प्रयत्न केला, तर आल्यानंतर थेट रेल रोको करणार असा इशारा बच्चू कडूंनी दिला.
गुरुवारी मंत्रालयात बैठक
शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर गुरुवारी (२९ ऑक्टोबर) मंत्रालयात बैठक होणार असल्याचे निश्चित झाले. आंदोलक नेते आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. त्यासाठी आंदोलक नेते सकाळी ११ वाजता मुंबईला रवाना होणार आहेत.
यावेळी अजित नवले म्हणाले की, आम्ही आंदोलन ठिकाणावरून पुढे आलो आहोत. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झालेला नाही. पण, जर न्यायालयाचा वापर करून जर आंदोलन दडपण्याची प्रक्रिया यापुढेही सुरू ठेवली, तर जेलला आम्ही घाबरत नाही. आमची जेलमध्ये जायची तयारी आहे. भगतसिंगांची अवलाद आहोत, पाहिजे ते करण्याची तयारी आहे, असा संदेश आम्ही मुख्यमंत्री सरकारला देत आहोत, असे अजित नवले म्हणाले.