लोकमत न्यूज नेटवर्कपचखेडी : महाराष्ट्र शासनाने लोकाभिमुख प्रशासनाचे स्वप्न दाखवत सर्व सेवा ऑनलाईन केल्या असल्या, तरी गेल्या आठ दिवसांपासून आपले सरकार या मुख्य पोर्टलचे सर्व्हर पूर्णपणे कोलमडले आहे. या तांत्रिक बिघाडामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून, विदर्भातील ४४ अंश सेल्सिअस तापमानात दाखल्यांसाठी तहसील आणि सेतू केंद्रांवर चकरा मारण्याची वेळ जनतेवर आली आहे. विशेषतः शैक्षणिक प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांअभावी विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २७ एप्रिलपासून महाऑनलाइन आणि आपले सरकार या संकेतस्थळांच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन-क्रिमीलेअर यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या दाखल्यांसाठी अर्ज करणे अशक्य झाले आहे. ज्या नागरिकांनी याआधीच अर्ज केले होते, त्यांचे दाखले मंजूर होऊनही केवळ सर्व्हर बंद असल्याने ते डाऊनलोड करता येत नाहीत.
बारावीचा निकाल दोन मे रोजी लागला आहे. बारावीनंतर इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया तत्काळ सुरू होते. या प्रक्रियेत आरक्षणाचा आणि इतर सवलतींचा लाभघेण्यासाठी वैध प्रमाणपत्रांची अत्यंत गरज असते. निकाल लागल्यामुळे आता खऱ्या अर्थाने दाखल्यांसाठी झुंबड उडणार आहे. मात्र, पोर्टल बंद असल्याने नवीन अर्ज भरता येत नाहीत. यामुळे निकाल लागला पण पुढे काय? असा गंभीर प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. सध्या विदर्भात भीषण उष्णतेची लाट आहे. अशा स्थितीत कुही तालुक्यासह ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आपले काम सोडून तालुक्याच्या ठिकाणी दाखल्यासाठी येतात. अनेक किलोमीटरचा प्रवास करून आणि भर उन्हात रांगेत उभे राहिल्यानंतर सर्व्हर बंद आहे हे ऐकल्यावर नागरिकांचा संताप अनावर होत आहे. यामुळे वेळ, श्रम आणि खिशातले पैसे यांचा मोठा अपव्यय होत असून प्रशासनाकडून साधी पूर्वसूचनाही दिली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पर्यायी बॅकअप यंत्रणा नाही का?
एकीकडे सर्व व्यवहार डिजिटल करण्याचे आवाहन सरकारकडून केले जाते, मात्र आठ-आठ दिवस एक महत्त्वाचे पोर्टल दुरुस्त होत नसेल, तर या व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी सरकारकडे कोणतीही पर्यायी बॅकअप यंत्रणा नाही का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
"एकीकडे सरकार डिजिटल इंडियाच्या गप्पा मारते आणि दुसरीकडे आठ-आठ दिवस मुख्य सर्व्हर दुरुस्त होत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. या कडक उन्हात सामान्य माणसाने किती दिवस चकरा मारायच्या?"- राजानंद कावळे, नागरिक
Web Summary : Maharashtra's Aaple Sarkar portal has been down for a week, causing hardship for citizens seeking essential documents. Students face delays in admissions due to unavailable certificates. The server outage raises questions about the reliability of online systems and the lack of backup solutions.
Web Summary : महाराष्ट्र का आपले सरकार पोर्टल एक सप्ताह से बंद है, जिससे नागरिकों को आवश्यक दस्तावेज प्राप्त करने में कठिनाई हो रही है। प्रमाणपत्रों की अनुपलब्धता के कारण छात्रों को प्रवेश में देरी का सामना करना पड़ रहा है। सर्वर आउटेज ऑनलाइन सिस्टम की विश्वसनीयता और बैकअप समाधानों की कमी पर सवाल उठाता है।