शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
2
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
3
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
4
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
5
'तुझे प्रेमसंबंध तोड'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
6
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
7
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
8
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
9
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
10
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
11
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
14
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

रामलल्ला की नगरी... चला, अयोध्येचा फेरफटका मारूया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:15 IST

‘सुबह बनारस, शाम अवध.’ सकाळ अनुभवावी तर ती बनारसला गंगेच्या किनारी आणि संध्याकाळी शरयूच्या घाटावर अयोध्येत शांतपणे वेळ घालवावा, असं म्हणतात! रामाची ही नगरी आहे मोठी सुंदर आणि मुख्य म्हणजे प्रेमळ, अगत्य असलेली!! चिंचोळ्या गल्ल्या, लूकलूक दिव्यांत एकसेएक पदार्थांचे ठेले, फुलांचे-अगरबत्तांचे सुगंध, माणसांची गर्दी, वाहनांचा कल्ला आणि ओळख नसतानाही अगत्य करण्याची स्थानिकांची आपुलकी, हे शहरच मोठं मोहक आहे!!

ठळक मुद्देआता राममंदिर शिलान्यास होतो आहे. पुढे मंदिर बांधून होईल, जगभरातून तिथं पर्यटक, भाविक येत राहतील. मात्र त्यासोबतही अवधची शाम तशीच सुंदर असेल. आणि चिरपुरातन, नित्यनूतन हे तत्त्व घेऊन सरयू वाहत राहील..

- मेघना ढोके

सुबह बनारस, शाम अवध.
- हे कितीदा ऐकलं होतं. बनारसची सकाळ कितीही अनुभवली, तरी मन भरत नाही.
एकेक घाट, सुखानं वाहणारी सकाळची प्रसन्न गंगामय्या हे सारं कितीही सोबत भरून घ्यायचं म्हटलं तरी आपल्या पोतडीत नाहीच मावत. मात्र बाटलीत गंगाजल भरून घ्यावं तशी काशीच्या घाटावरची सकाळ मनात साठवून अलाहाबादकडे निघाले तो दिवस अजून आठवतो..
अलाहाबादला मुक्काम ठोकून एक दिवस चित्रकुट आणि पुढे अयोध्येला जायचं असं ठरवलं होतं. थंडीचे-घना कोहरा असलेले-सूर्य दर्शन नावालाही न होणारे दिवस. ठायीठायी रस्त्याकडेला अलाव (अर्थात शेकोट्या) पेटलेले आणि धगधगत्या निखार्‍यांसह कुल्हड चहा पीत बसलेली, हात शेकत बसलेली, कानटोप्या-मफलरवाली काकडलेली माणसं दिसत होती.
अयोध्येत पोहोचलो तोवर सायंकाळचे खरं तर चारच वाजले होते. पण कोहरा दाट आणि अंधारही. लूकलूक दिवे दिसत होते, चमचमत होती अयोध्या.
अवधची सायंकाळ अनुभवायची, शरयू नदीच्या काठावर जाऊन बसायचं, जमलं तर पटकन हनुमान गढीवर जाऊन यायचं, कनक भवन पहायचं. असं बरंच काही मनात होतं.
मात्र नेमके दिवे गेले. गच्च अंधार. थंडी प्रचंड. थोडा पाऊसही झाला.
आपण लहानपणी टीव्हीवर रामायण पाहताना मनात/कल्पनेत पाहिलेली हीच ती अयोध्या नगरी, आणि आपण खरंच अयोध्येत आहोत याची आनंदी उत्सुकता जाणवायला लागली होती.
जिथे उतरले होते तिथून नवा घाट जवळच होता. त्या घाटावर जाऊन निवांत बसावं असं मनात होतं.
काहीकाळ शरयूच्या काठी जाऊन बसावं म्हणून तिकडे गेलो; पण सोबतचा  स्थानिक  माणूस सांगत होता, रात को नहीं जाना घाट, सुबह चले जाए, अभी चलो हनुमानजीके दरसन कर आते है.
अयोध्येत आल्यापासून जाणवत होतं, भेटलेल्या प्रत्येक माणसाच्या ओठी असलेली अवधी. तिची गोडी. ती हिंदी वेगळीच होती. त्यात आब तर होताच; पण नजाकतही आणि आपलेपणाही.
सोबत होते पांडेजी. गाइडचं काम करत होते. म्हणाले, ‘श्रीरामलल्लाजी के दरसन तो अभी नहीं होंगे, सुबह जाना पडेगा. शाम हो गयी, दरसन बंद हो जाता है!’


त्यादिवशी सायंकाळी मग नवा घाटावरूनच ‘सरयूजी के’ दर्शन करून हनुमान गढी, कनक भवन पहायला जायचं ठरलं.
हनुमान गढी भागात जात नाही तोच पांडेजींचा एक स्थानिक मित्र भेटला. म्हणाला, ‘यहॉँ आए और अभी यहॉँ के नारियल के लड्ड नहीं खाए?
आपल्या घरी आलेल्या माणसाचं अगत्य करावं आणि त्याची खास देखभाल करावी तसं त्यांनी आवर्जून चारचारदा सांगितलं की, नारियल के लड्ड यहॉँ जैसे मिलते है, दुनिया में कहीं नहीं मिलते, और चाट खाये की नहीं यहॉँ की.?’
त्या भागातल्या चिंचोळ्या गल्ल्या, थंडीत कुडकुडत, लूकलूक दिव्यांत सगळे एकसेएक पदार्थांचे ठेले, फुलांचे-अगरबत्त्यांचे सुगंध, माणसांची गर्दी, पाऊस होऊन गेल्यानं पायाखाली वाहतं पाणी, जोरात शेजारून जाणारी वाहनं आणि हातात नारियल लाडू.. ओळख नसतानाही अगत्य करण्याची स्थानिकांची आपुलकी हे सारंच मोहक होतं.
एरव्ही अयोध्या हेही एक धार्मिक तीर्थस्थळ, पर्यटक येणं इथं स्थानिकांना नवीन नाही. पर्यटन हाच इथला मुख्य व्यवसाय. लहानसहान फळाफुलांचे, पूजा साहित्याचे, खाण्यापिण्याचे, चहाचे स्टॉल लावून अनेकजण आपला चरितार्थ चालवतात.
यात्री येत-जात राहणं नवीन नाही असं हे गाव मात्र तरीही पर्यटकांशी संवादात खास अवध हिंदीची अदब आणि मिठ्ठास ठेवून माणसं बोलतात. शांतपणे. तुटक-तुसडेपणा चुकून दिसत नाही.
आपण अयोध्येत आहोत या आनंदी कल्पनेतून वर्तमानात आणायचं काम या माणसांनी आणि भवतालच्या गर्दीनं केलं. ट्रॅफिक जाम तसं इथं आम होतं. मात्र त्यातून घाईनं वाट काढत चला, कनक भवन जाऊ, त्रेता का ठाकूर मंदिर पाहू असं म्हणत पांडेजी पावलं उचला असा आग्रह करत होते.
अयोध्येत ठायीठायी मठ, जुन्या वास्तू, ऐतिहासिक खुणा, पुरातन गोष्टी ठायीठायी दिसतात.  बोलता बोलता गाइडसह दुसराही कुणी पटकन सांगून टाकत असतो, ये जो है ना, रामजीके जमानेसे है!
चिरपुरातन आणि नित्यनवीन असा अनुभव अयोध्या सतत देत राहाते.
कनक भवन परिसरात माकडं खूप, टणाटण उड्या मारत, जुन्या वाडेवजा, मठवजा घरांच्या भिंतींवर कोनाड्यात माकडांचा कुटुंबकबिला सुखानं नांदत असतो.
कनक भवनच्या दारात उभा कुणी साधू पटकन म्हणतो, ‘डरिये नहीं, कुछ नहीं करेंगे, रामजीकी सेना है.!’
या साध्यासुध्या गप्पांतूनही ‘भोजन’ केलं की नाही यावर चर्चा पोहोचतेच. आणि मग होतेच श्री कनक सरकार रसोईच्या थालीची चर्चा. इथे थाळी खाणार्‍यांची गर्दी फार. इथला स्वाद सोबत न्यायचा म्हणून टुरिस्ट इथं जेवतात.
गर्दी दिसते. लोक भराभर खातात, निघतात. 
तशा या गावात धर्मशाळाही खूप आणि भोजनालयंही.
प्रत्येक भोजनालयाची आपली अशी खास ओळख कळते. अनेकदा तर वादही होतात की, अमुक भोजनालयच खास, तमुक तर खासच. कुणी म्हणतं कनक सरकार रसोई बेस्ट, कुणी म्हणतं अमनचंद्र भोजनालय. कुणी म्हणतं चंद्रा मारवाडी भोजनालय तर कुणी म्हणतं चंद्रावाल्यांचे खुरचन पेढे नाही खाल्ले तो क्या अयोध्या आए?
या प्रश्नाचं आणखी एक उत्तर म्हणजे श्रीरामलल्लाचं दर्शन. भल्या सकाळी त्यासाठी निघालो. तिथं मोठा पोलीस बंदोबस्त असतो, फोन-पर्स काही आत नेऊ देणार नाही, सिक्युरिटी चेक खूप असं स्थानिकांनी वारंवार सांगितल्यानं दोन हस्तक आणि तिसरं मस्तक  एवढंच घेऊन देवदर्शनाला निघालो.
अपेक्षेप्रमाणे सैन्याचा पहारा होता. आधी स्थानिक पोलीस मग सैन्याच्या सिक्युरिटी चेकमधून बाहेर पडत, अत्यंत शांततेत दूर लांबवरून दिसणार्‍या रामलल्लाचं दर्शन झालं.
परतीच्या मार्गावरही भरपूर प्रसादाची दुकानं. अनेक दुकानांत छोटे पोर्टेबल टीव्ही लावलेले. त्यावर 1992चे, कारसेवेचे व्हिडिओ वारंवार दाखवले जात होते. लहान लहान लेकरं हाका मारमारून त्या सीडी घ्या म्हणत मागे लागत.  बाकी फुलंफळंप्रसादासह भेटवस्तूच्या दुकानांनी ती गल्ली गजबजलेली होतीच. मात्र नेमकी तेव्हाच पावसानं दाणादाण उडवली, आणि सगळीकडे चिखल झाला. माणसांसह गायीगुरं माकडंही आडोशाला गेली.
भरपावसात कुल्हड चहा पीत दुकानदाराशी गप्पा रंगल्या, तर तो पटकन म्हणून गेला, रामजीही है, जो ये पेट पाल रहे है, बाकी यहॉँ ना फसल अच्छी होती है, ना कोई फॅक्टरी पहुंचा है!’
जागोजागी गर्दी, पावसाच्या पाण्याचे वाहते पाट, उघड्या गटारी आणि दिलखुलास बोलणारी माणसं, लांब चिंचोळ्या गल्ल्या आणि थंडीचा कडाका अशी अयोध्या भेटत होती.
साध्या साध्या माणसांशी बोललं की कळतं, आपण अयोध्येत आहोत म्हणजे पुण्यवान आहोत असं वाटतं माणसांना इथं! अर्थात अयोध्यानिवासी असण्याचा अभिमान आहे; पण गर्व काही कुणाच्या बोलण्यात झळकला नाही. गप्पांत हमखास कुणीतरी सांगतंच की, अहंकारी तो रावण था, हम तो रामजीके भक्त है!
हे असं साधं गाव शरयूच्या काठावर बसलं की सोबत करतं. किती गोष्टी पोटात घेऊन ही ‘सरयूजी’ही वाहते, शृंगार घाटावर वेगळी भासते, गुप्तार घाटावर किंवा नवा घाटावरही वेगळी दिसते. मात्र त्यासार्‍यात एक विलक्षण साधेपणा, सादगी दिसते. म्हणजे तशी ती असतेच.
ही ‘सादगी’ ही या गावची खासियत असावी असं वाटत राहतं.
माणसंही फुरसत असल्यासारख्या गप्पा मारतात. राजकीय चर्चा तर हमखास रंगतातच. 
पण मग कुणीतरी म्हणतंच, ‘मंदिर तो बनेगाही, पुरा विश्वास है! पर सडक भी बने, और इंडस्ट्रीभी आए यहाँ पे, वो भी तो जरुरी है. सहर ना जाना पडे. दूर.’
- माणसं पोटापाण्यासाठी स्थलांतर करतात याचं दु:ख असं अचानक डचमळून वर येतंच.. काही क्षण तरी!
- अर्थात ही सारी कहाणी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होण्यापूर्वीची आहे. निवडणूक तोंडावर होती तेव्हा मी अयोध्येत असताना पाहिलेलं हे चित्र, आजही स्मरणात तितकंच ताजं आहे.
देस में मोदी, प्रदेस में योगी हा नारा तेव्हा बुलंद होता. त्यानंतर योगीजी मुख्यमंत्री झाले, शरयूंच्या घाटांवर गंगाआरतीसारखी आरती सुरूझाली. शहरांत स्वच्छता, साफसफाई, सॅनिटायझेशनच्या कामांनी वेग घेतला असंही बातम्यांतून कळत राहिलं. स्थानिकांची मागणीच होती की त्या कामाला वेग द्या.
बदल होऊ लागले. यापुढेही होतील.
आता श्रीराममंदिर शिलान्यास होतो आहे. पुढे मंदिर बांधून होईल, जगभरातून तिथं पर्यटक, भाविक येत राहतील. मात्र त्यासोबतही अवधची शाम तशीच सुंदर असेल. आणि चिरपुरातन, नित्यनूतन हे तत्त्व घेऊन सरयू वाहत राहील..
meghana.dhoke@lokmat.com
(लेखिका लोकमत वृत्तसमुहात मुख्य उपसंपादक आहेत.)