‘कुर्बानी देणार कोण? शरद पवार? उद्धव ठाकरे? की…’, राज्यसभा, विधान परिषदेच्या उमेदवारीवरून भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 14:51 IST2026-02-19T14:48:56+5:302026-02-19T14:51:01+5:30
Rajya Sabha Election News: महाराष्ट्रातील सध्याच्या गोळाबेरजेनुसार राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये केवळ प्रत्येकी एक जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. तसेच या जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

‘कुर्बानी देणार कोण? शरद पवार? उद्धव ठाकरे? की…’, राज्यसभा, विधान परिषदेच्या उमेदवारीवरून भाजपाचा टोला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणााला आता राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात राज्यातील राज्यसभेच्या सात जागांसाठी बुधवारी निवडणूक जाहीर झाली असून, सध्याच्या गोळाबेरजेनुसार राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये केवळ प्रत्येकी एक जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. तसेच या जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यावरून आता भाजपाने महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. तसेच मैत्रीमध्ये कुर्बानी कौन देगा? असा सवाल भाजपाने विचारला आहे.
या संदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आंखे चित्रपटातील उदाहरण देत लिहिलं की, गोविंदा आणि चंकी पांडे यांच्या गाजलेल्या आंखें चित्रपटात कादर खान आणि सदाशिव अमरापूरकर यांच्यातला एक भन्नाट संवाद आहे. दोघे जिवलग मित्र, दोघेही बिंदूवर प्रेम करणारे असतात आणि पार्टीत बिंदूही दोघांकडे सारखंच लक्ष देते. तेव्हा सदाशिव अमरापूरकर म्हणतात की, “एकाला कुर्बानी द्यावी लागेल…”. त्यानंतर कादर खान थेट सवाल विचारतात की, “कुर्बानी देगा कौन?” आज हा संवाद आठवण्याचं कारण म्हणजे आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुका हे होय.
या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी दोन्हीकडे एकच उमेदवार देऊ शकते. त्यात राज्यसभेसाठी शरद पवार पुन्हा जावेत, यासाठी संजय राऊत आग्रही आहेत. काँग्रेसने स्पष्ट अशी अट घातली आहे. राज्यसभेला पवारांना पाठिंबा दिला, तर विधानपरिषदेला उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणार नाही, असे काँग्रेसने स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणजेच समीकरण स्पष्ट आहे. त्यामुळे यात एकाची अडचण ठरलेलीच आहे. आता या दोघांच्या मैत्रीत कुर्बानी कोण देणार? शरद पवार? उद्धव ठाकरे? की दोघे मिळून काँग्रेसचाच बळी घेणार? असा खोचक सवाल केशव उपाध्ये यांनी विचारला आहे.