Normal vs Premium Petrol: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर कमी करण्याबाबत केलेल्या विधानानंतर दरवाढीच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे देशातील तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ केली आहे. १५ मे पासून हे नवे दर देशभरात लागू झाले आहेत.
प्रमुख शहरांतील नवे दर:
दिल्ली: राजधानी दिल्लीत पेट्रोल आता ९७.७७ रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल ९०.६७ रुपयांवर पोहोचले आहे.
मुंबई: आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरात ३.१४ रुपयांची वाढ होऊन ते १०६ रुपये प्रति लिटर झाले आहे. तसेच, मुंबईत डिझेलने नव्वदी ओलांडली असून आता ९३.१४ रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे.
तुम्हाला माहिती आहे का? पेट्रोलचे 'हे' दोन प्रकार
दरम्यान, पेट्रोलमध्ये सामान्य आणि प्रीमियम, असे दोन प्रकार असतात. अनेकांना यातील फरक माहित नसतो. तुमच्या गाडीसाठी कोणते पेट्रोल योग्य आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
१. नॉर्मल पेट्रोल - हे पेट्रोल सामान्यतः दैनंदिन वापराच्या गाड्या, स्कूटर्स आणि कारसाठी वापरले जाते. याला 'रेग्युलर पेट्रोल' असेही म्हणतात. भारतात साध्या पेट्रोलचा ऑक्टेन नंबर ९१ असतो, जो सामान्य इंजिनसाठी पुरेसा मानला जातो.
२. प्रीमियम पेट्रोल - प्रीमियम पेट्रोलमध्ये नॉर्मल पेट्रोलच्या तुलनेत जास्त ऑक्टेन आणि काही अॅडव्हान्स 'ॲडिटिव्ह्ज' मिसळलेले असतात. याचा ऑक्टेन नंबर ९५ किंवा त्यापेक्षा जास्त असतो. हे पेट्रोल हाय-परफॉर्मन्स गाड्यांसाठी डिझाइन केलेले असते.
नॉर्मल आणि प्रीमियम पेट्रोलमधील मुख्य फरक
ऑक्टेन नंबर: ऑक्टेन नंबर जितका जास्त, तितकी इंधन जळण्याची प्रक्रिया नियंत्रित असते. यामुळे इंजिनमध्ये 'नॉकिंग' (झटके किंवा आवाज) येण्याची समस्या कमी होते.
इंजिनची क्लीनिंग: प्रीमियम पेट्रोलमधील ॲडिटिव्ह्ज इंजिनमधील कार्बन जमा होऊ देत नाहीत, ज्यामुळे इंजिन दीर्घकाळ स्वच्छ राहते.
मायलेज आणि परफॉर्मन्स: यामुळे गाडी चालवताना स्मूथ वाटते आणि काही प्रमाणात मायलेजमध्येही सुधारणा होऊ शकते.
तुमच्या गाडीसाठी कोणते पेट्रोल योग्य?
जर तुमची गाडी सामान्य इंजिनची असेल, तर कंपनीच्या सल्ल्यानुसार नॉर्मल पेट्रोल पुरेसे आहे. मात्र, जर तुमच्याकडे स्पोर्ट्स बाईक, लक्झरी कार किंवा टर्बो इंजिन असलेली गाडी असेल, तर प्रीमियम पेट्रोल वापरणे इंजिनच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते.
किमतीतील तफावत:
प्रीमियम पेट्रोलची किंमत नॉर्मल पेट्रोलपेक्षा साधारणपणे ८ ते १५ रुपये प्रति लिटरने जास्त असते. सध्या दिल्लीत नॉर्मल पेट्रोल ९४.८१ रुपये असताना प्रीमियम पेट्रोलचे दर मार्चमधील वाढीनंतर ११३.७७ रुपये प्रति लिटरवर आहेत.
