Sunil Bharti Mittal Successor: भारती एअरटेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील भारती मित्तल यांनी मुकेश अंबानी आणि गौतम अडाणी यांच्या पावलावर पाऊल टाकत व्यवसायाच्या उत्तराधिकाराबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. गुरुवारी कंपनीच्या अर्निंग कॉल दरम्यान मित्तल यांनी स्पष्ट केलं की, येत्या १० वर्षांच्या आत ते कंपनीची धुरा पुढच्या पिढीकडे सोपवण्याची योजना आखत आहेत. विशेष म्हणजे, कंपनीच्या बोर्डानं १ ऑक्टोबर २०२६ पासून पुढील पाच वर्षांसाठी सुनील मित्तल यांची पुन्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे.
आर्थिक निकाल आणि भविष्यातील धोरण
चौथ्या तिमाहीच्या निकालांवर भाष्य करताना सुनील मित्तल यांनी निकालांवर नाराजी व्यक्त केली आहे. मोबाइल सेवांमधील नफा वाढवण्यासाठी कंपनी आगामी काळात 'एआरपीयू' (प्रति ग्राहक सरासरी महसूल) वाढवण्यावर भर देणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत. सध्या एअरटेलचा ARPU २४५ रुपयांवरून २५७ रुपयांवर पोहोचला आहे, जो अधिक वाढवण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे.
नफ्यात घट, पण महसुलाचा विक्रम
मार्च २०२६ ला संपलेल्या तिमाहीत एअरटेलची कामगिरी संमिश्र राहिली आहे. यादरम्यान कंपनीचा निव्वळ नफा ३३.५% नी घसरून ७,३२५ कोटी रुपयांवर आला आहे. कर आणि अन्य दायित्वांसाठी केलेल्या तरतुदीमुळे नफ्यात ही घट झाली आहे. एअरटेलनं प्रथमच वार्षिक २ लाख कोटी रुपयांच्या महसुलाचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केलाय. तिमाही आधारावर ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल १५.६% नी वाढून ५५,३८३.२ कोटी रुपये झाला आहे. यामध्ये आफ्रिकेतील व्यवसायानं नोंदवलेल्या ४०% वाढीचा मोठा वाटा आहे.
६५ कोटी ग्राहकांचा टप्पा आणि शेअर्समध्ये तेजी
एअरटेलच्या व्यवसायाचा विस्तार वेगानं होत असून मार्च २०२६ मध्ये कंपनीने ६५ कोटी ग्राहकांचा टप्पा पार केलाय. नफ्यात घट होऊनही कंपनीचे भक्कम स्थान पाहून गुरुवारी एअरटेलच्या शेअर्समध्ये ३% पेक्षा जास्त वाढ दिसून आली. सुनील मित्तल यांच्या पुनर्नियुक्तीसोबतच, बोर्डाने निसबा गोदरेज यांनाही ४ ऑगस्टपासून पुढील पाच वर्षांसाठी स्वतंत्र संचालक म्हणून दुसऱ्या कार्यकाळासाठी मंजुरी दिली आहे.
अंबानी-अडाणींचीही अशीच तयारी
सुनील मित्तल यांच्याप्रमाणेच मुकेश अंबानी यांनी आपल्या तिन्ही मुलांना रिलायंसच्या बोर्डात सामील करून व्यवसायाची सूत्रं पुढच्या पिढीकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दुसरीकडे, गौतम अडाणी यांनीही वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्त होण्याची योजना आखली असून २०३० च्या सुरुवातीपर्यंत ते आपला व्यवसाय पुढच्या पिढीकडे सोपवणार आहेत.
