'सरन्यायाधीशांचे स्वागत करणे हा प्रोटोकॉल; कावीळ झालेल्यांना सगळं पिवळं दिसतं'; चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 19:15 IST2026-01-25T18:56:11+5:302026-01-25T19:15:03+5:30
संजय राऊत यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना वाघ म्हणाल्या की, राऊत यांची तब्येत ठीक आहे की नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल, कारण त्यांच्या वक्तव्यांचा त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचे दिसते. प्रोटोकॉलच्या बाबतीत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

'सरन्यायाधीशांचे स्वागत करणे हा प्रोटोकॉल; कावीळ झालेल्यांना सगळं पिवळं दिसतं'; चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका
धुळे : देशाचे सरन्यायाधीश महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर त्यांचे स्वागत करणे हा शासकीय प्रोटोकॉल असल्याचे सांगत, भाजप आमदार चित्रा वाघ यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. “राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीशांचे स्वागत केले, यात काहीही चुकीचे नाही. मात्र कावीळ झालेल्या माणसाला जसे सगळे पिवळे दिसते, तसेच सध्या संजय राऊत यांना दिसत आहे,” असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी लगावला.
संजय राऊत यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना वाघ म्हणाल्या की, राऊत यांची तब्येत ठीक आहे की नाही, याचीही काळजी घ्यावी लागेल, कारण त्यांच्या वक्तव्यांचा त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचे दिसते. प्रोटोकॉलच्या बाबतीत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुंबई महापौरपदावर भाष्य
मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेबाबत चित्रा वाघ म्हणाल्या की, महायुती पूर्णपणे अभेद्य आहे आणि मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होईल. “मुख्यमंत्री महाराष्ट्रात परतले असून, लवकरच याबाबत निर्णय जाहीर होईल. आमची लाडकी बहीणच मुंबईची महापौर बनेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, “हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. इथे भल्याभल्यांना पाणी पाजले गेले आहे. त्यामुळे समाजातील शांतता बिघडवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये.” राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सक्षम असून, अशा प्रकरणांत कठोर कारवाई करण्याची ताकद त्यांच्याकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.