'महिला सुरक्षा, पीडितांना संरक्षण, विकासकामांना गती आणि विधिमंडळातील जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडणार', निलम गोऱ्हे यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:34 IST2026-05-05T15:33:23+5:302026-05-05T15:34:30+5:30
Neelam Gorhe News: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून, सोमवारी ०४ मे २०२६, रोजी महाराष्ट्र विधिमंडळ, विधानभवन येथे त्यांना निवडून आल्याचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

'महिला सुरक्षा, पीडितांना संरक्षण, विकासकामांना गती आणि विधिमंडळातील जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडणार', निलम गोऱ्हे यांचं विधान
मुंबई - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून, सोमवारी ०४ मे २०२६, रोजी महाराष्ट्र विधिमंडळ, विधानभवन येथे त्यांना निवडून आल्याचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० एप्रिल २०२६ रोजी डॉ. नीलम गोऱ्हे आणि ओमप्रकाश (बच्चू) कडू यांना उमेदवारी दिली होती. २ मे रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी (नऊ अधिक एक) २३ एप्रिल ते १३ मे असा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल होती. त्यानंतर छाननी झाली आणि उर्वरित अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी व कमतरता आढळल्याने ते बाद झाले. परिणामी नऊ उमेदवार आणि नऊ जागा अशी स्थिती निर्माण होऊन ही निवडणूक बिनविरोध झाली.
या आनंदमय क्षणी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “विधानपरिषदेच्या या निवडणुकीत आम्हा नऊ उमेदवारांना विजयी करण्याचे संकेत आधीच मिळाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आणि ओमप्रकाश (बच्चू) कडू यांना उमेदवारी दिली. अर्जांमधील तांत्रिक त्रुटींमुळे इतर अर्ज बाद झाल्याने आम्ही सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आलो. आज आम्हाला निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र विधानमंडळाच्या निर्वाचन अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले.”
त्या पुढे म्हणाल्या की, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा पुढे नेत असलेले आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही संधी दिली. त्यांच्या या विश्वासाबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी कार्यरत राहीन.”
“महायुतीतील घटक पक्षांचे सहकार्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मार्गदर्शन यामुळे मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या काळात अनेकांना मदत करता आली आणि पुढील काळातही महिला विकास, तीर्थक्षेत्र विकास, महिलांची सुरक्षा, पीडित महिलांचे संरक्षण, तसेच शिवसैनिकांच्या माध्यमातून विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवणे आणि विधिमंडळातील कामकाज प्रभावीपणे पार पाडणे यासाठी मी सक्रिय राहणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.