आदिवासी विद्यार्थ्यांनी सुरू केले बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2016 17:18 IST2016-09-26T17:18:04+5:302016-09-26T17:18:04+5:30

मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवार, २६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला.

Tribal students started hunger strike | आदिवासी विद्यार्थ्यांनी सुरू केले बेमुदत उपोषण

आदिवासी विद्यार्थ्यांनी सुरू केले बेमुदत उपोषण

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 26 - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील वसतिगृहांमध्ये सर्व नवीन अप्रवेशित विद्यार्थी विद्यार्थिनींना तत्काळ प्रवेश, वसतिगृहांची क्षमता वाढविणे तसेच प्रकल्प अधिकाऱ्याची बदली या तीन मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवार, २६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. यावेळी ३४ विद्यार्थी उपोषणास बसले असून, त्यांच्या समर्थनार्थ जवळपास दोन हजार विद्यार्थी उपोषणमंडपात उपस्थित होते.
अकोला, बुलडाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यांतील बहुसंख्य आदिवासी विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. वसतिगृहात प्रवेश मिळविण्यापूर्वीं आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रथम महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, ही अट तिन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पूर्ण करून मोठ्या संख्येने वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज सादर केले आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होऊन तीन महिने झाले असून, प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची एकही यादी अद्याप लावण्यात आलेली नाही. परिणामी, शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांवर वणवण भटकण्याची पाळी आली आहे. गत शैक्षणिक वर्षात अशीच परिस्थिती निर्माण झालेली असताना, केवळ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून माजी प्रकल्प अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची वसतिगृह प्रवेश क्षमता १२५ वरून २९४ वाढविली होती. आदिवासी विद्यार्थ्यांचा ओढा शिक्षणाकडे वाढत आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांसमोर वसतिगृह निर्माण होणारा हा प्रश्न दूर करण्यासाठी अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांच्या वसतिगृहांचा विस्तार करून विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढविण्याची मागणी आदिवासी विद्यार्थ्यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यातील वसतिगृहांची विद्यार्थी प्रवेश क्षमता एक हजाराने, तर बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील वसतिगृहांची क्षमता प्रत्येकी ५०० विद्यार्थी अशी वाढविण्याची मागणीसुद्धा या निवेदनात विद्यार्थ्यांनी केली आहे. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या आंदोलनात तीन जिल्ह्यातील ११ शासकीय वसतीगृहांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
आमदार हरीश पिंपळेंनी दिली भेट
मूर्तिजापूरचे आमदार हरिश पिंपळे यांनी उपोषणास प्रारंभ करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. नियोजन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी या मुद्यावर सामोपचाराने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Tribal students started hunger strike