शंकराचार्यांवर शिर्डीत गुन्हा

By Admin | Updated: June 25, 2014 18:51 IST2014-06-24T23:53:41+5:302014-06-25T18:51:41+5:30

शिर्डी : साईबाबांच्या देवत्वावर व ते हिंदू-मुस्लिमांचे प्रतीक असण्यावर घेतलेल्या आक्षेपाने संतप्त झालेल्या शिर्डीकरांनी शंकराचार्यांच्या विरोधात शिर्डी ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Shirdacharacharya Shirda crime | शंकराचार्यांवर शिर्डीत गुन्हा

शंकराचार्यांवर शिर्डीत गुन्हा

शिर्डी : द्वारकेच्या शंकराचार्यांनी साईबाबांच्या देवत्वावर व ते हिंदू-मुस्लिमांचे प्रतीक असण्यावर घेतलेल्या आक्षेपाने संतप्त झालेल्या शिर्डीकरांनी मंगळवारी या शंकराचार्यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान या संदर्भात साईनगरीत दुसऱ्या दिवशीही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या़
शिर्डीतील सर्वधर्मीयांच्या वतीने नितीन कोते यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या शंकराचार्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली़ त्यानुसार शिर्डीचे पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्यावर कलम २९५-अ, २९८ नुसार (धार्मिक भावनांचा अप्रचार करून तेढ निर्माण करणे, धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करणे) अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे़ यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, उपनगराध्यक्ष राजेंद्र कोते, कमलाकर कोते, शिवाजी गोंदकर, विजय कोते, जमादारभाई शेख, मौलाना असगरअली, दत्तात्रय कोते, विजय जगताप, निलेश कोते, गफ्फारखान पठाण, विष्णू थोरात, कैलास कातोरे, हमीदभाई, सचिन कोते, गणीभाई पठाण, मंगेश त्रिभुवन, सचिन चौघुले आदी उपस्थित होते़
यावेळी मंदिराचे पुजारी बाळासाहेब जोशी, सचिन तांबे, सुधाकर शिंदे, अ‍ॅड़ शिवाजी सजन, रवींद्र कोते, ताराचंद कोते, मिलिंद कोते, वेणुनाथ गोंदकर, दीपक वारूळे, भरत चांदोरे आदींची उपस्थिती होती़ संस्थान कर्मचाऱ्यांच्या वतीने तुषार शेळके यांनी शंकराचार्यांच्या वक्तव्याचा निषेध केला़ (वार्ताहर)
एकात्मतेचे दर्शन
शंकराचार्यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी सकाळी सर्वधर्मीय शिर्डीकर एकत्र आले़ एका बाजूने हिंदू, तर दुसऱ्या बाजूने मुस्लिम बांधवांनी धरलेल्या साईप्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात आली़यावेळी या मिरवणुकीसमोर घंटानाद करण्यात आला़ यानंतर मंदिर परिसरात या मिरवणुकीचे रुपांतर निषेध सभेत झाले़ यावेळी जमादारभाई व गणीभाई पठाण यांनी साईबाबा मुस्लिमांच्या हृदयात असल्याचे सांगितले़ बाबांनी सर्व धर्मातील रूग्णांवर उपचार केले, सर्व धर्माचे लोक त्यांना परमेश्वर मानतात.
मानसिक रूग्ण असल्याचा दावा
अनेकांनी हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याचा दावा करत शंकराचार्य हे मानसिक रुग्ण असून त्यांच्या उपचारासाठी शहरात भिक्षा झोळी फिरवून निधी उभारण्याचे आवाहन केले़
पोलीस महानिरीक्षकांना निवेदन
इन्स्पेक्शनच्या निमित्ताने शिर्डीत आलेले नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांचीही भेट घेऊन सर्वधर्मीय शिर्डीकरांनी त्यांना निवेदन दिले़ यावेळी साळुंके यांनी शिर्डीतील जातीय सलोख्याचे कौतुक करत, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अपप्रवृत्तींपासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला़ याप्रसंगी पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता ठाकरे आदी उपस्थित होते़

Web Title: Shirdacharacharya Shirda crime