भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंवर यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. "गरीब हिंदी भाषिकांना काय मारता? उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडूत या तुम्हाला उचलून आपटू", असे आव्हान दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिले. मात्र, यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी ठिणगी पडली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी निशिकांत दुबे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी हा दुबे कोण आहे? असा प्रश्न विचारला आणि म्हणाले की, "मी येथील हिंदी भाषिक नेत्यांना दुबे यांनी दिलेल्या विधानाचा निषेध करण्याचे आवाहन करतो. तरच मी त्यांना म्हणने की, तुम्ही महाराष्ट्राचे आहात. भाजप खासदार मराठी माणसांविरुद्ध अशी वक्तव्य करत असताना मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ गप्प बसतात, याचे मला आश्चर्य वाटते. ते कोणत्या प्रकारचे मुख्यमंत्री आहेत? त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नावे घेण्याचा अधिकार नाही."
एकनाथ शिंदेंवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, "स्वतःला दुटप्पी शिवसेनेचे नेते मानणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी दाढी कापावी आणि राजीनामा द्यावा. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहकडे जाऊन महाराष्ट्रात काय चालले आहे? हे विचारावे. महाराष्ट्रात कधीच हिंदी भाषिक लोकांवर हल्ले झाले नाहीत. दुबेंना सरळ करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची आहे."
दुबे काय म्हणाले?दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तुम्ही हिंदी भाषकांना मारताय? उर्दू बोलणाऱ्यांना मारुन दाखवा. मराठी आंदोलक हे सलाऊद्दीन, मसूद अजहर, दाऊदसारखे आहेत. दहशतवाद्यांनी हिंदुंवर अत्याचार केले आणि हे तर हिंदीवरच अत्याचार करत आहेत, अशी टीका केली. आपल्या गल्लीत, घरात कोणीही सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवू. तुम्हाला आपटून आपटून मारू. मराठी लोक कुणाची भाकर खातायत? आमच्या पैशांवर तुम्ही मराठी जगताय. तुम्ही मराठी किती किती कर देता? किती लोकांकडे कोणते उद्योग आहेत? आमच्याकडे खाणी आहेत, तुमच्याकडे आहेत का? असे दुबे म्हणाले होते.