"तुम्ही स्वार्थी आहात की..."; रोहित पवारांचा पटेलांवर थेट हल्ला; राजस्थानमधील 'त्या' लग्नाचा काढला पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 21:27 IST2026-03-07T21:20:26+5:302026-03-07T21:27:08+5:30

रोहित पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

Rohit Pawar Confronts Praful Patel Over VSR Aviation Owner Connection | "तुम्ही स्वार्थी आहात की..."; रोहित पवारांचा पटेलांवर थेट हल्ला; राजस्थानमधील 'त्या' लग्नाचा काढला पुरावा

"तुम्ही स्वार्थी आहात की..."; रोहित पवारांचा पटेलांवर थेट हल्ला; राजस्थानमधील 'त्या' लग्नाचा काढला पुरावा

Rohit Pawar on Praful Patel: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. हा केवळ अपघात होता की घातपात? यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, आता आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत अत्यंत गंभीर आणि खळबळजनक दावा केला आहे. रोहित पवारांनी थेट व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाचा दाखला देत पटेलांना घेरले आहे.

बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हापासून पवार कुटुंबीयांनी या अपघाताच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे. जय पवार आणि रोहित पवार यांनी ज्या कंपनीचे विमान होते, त्या व्हीएसआर कंपनीवर संशयाची सुई रोखली आहे. मात्र, दुसरीकडे अजित पवार यांच्याच पक्षाचे नेते रोहित पवारांवर अपघाताचे राजकारण करत असल्याची टीका करत आहेत.

रोहित पवारांची पटेलांना टार्गेट करणारी पोस्ट

रोहित पवार यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधत काही बोचरे प्रश्न उपस्थित केले आहेत. 

"प्रफुल पटेल जी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला / घातपातला कारणीभूत असलेल्या व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल ते आपण लोकांना सांगावं.. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे महाराष्ट्राला दाखवून द्या… उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अपेक्षा," असे रोहित पवार यांनी म्हटलं.

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या नागरी उड्डाण मंत्रालयातील दांडग्या संपर्काचाही उल्लेख केला होता. "पटेलांचे एव्हीएशन सेक्टरमध्ये तगडे संपर्क आहेत. त्यांनी आम्हाला पुरावे गोळा करण्यात मदत केली असती तर चांगले झाले असते, पण तसे झाले नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पटेलांनी या प्रकरणात मौन का बाळगले आहे, असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.

राजकारणात नवी ठिणगी!

रोहित पवारांनी पटेलांना उद्या पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देण्याचे आवाहन केले आहे. या आरोपांनंतर आता प्रफुल्ल पटेल कोणती भूमिका घेतात आणि रोहित सिंगवरून सुरू झालेला हा वाद कोणत्या थराला जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Rohit Pawar Confronts Praful Patel Over VSR Aviation Owner Connection