रखडलेले तीन उड्डाणपूल पुन्हा पालिकेच्या पटलावर

By Admin | Updated: June 3, 2015 03:24 IST2015-06-03T03:24:29+5:302015-06-03T03:24:29+5:30

ठाणे शहरात मीनाताई ठाकरे चौक, तीन पेट्रोल पंप, नौपाडा एक्सचेंज अशा तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय २००७ मध्ये मुंबई महानगर प्रदेश

The remaining three flyovers will again be raised on the Palak's plate | रखडलेले तीन उड्डाणपूल पुन्हा पालिकेच्या पटलावर

रखडलेले तीन उड्डाणपूल पुन्हा पालिकेच्या पटलावर

ठाणे : ठाणे शहरात मीनाताई ठाकरे चौक, तीन पेट्रोल पंप, नौपाडा एक्सचेंज अशा तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय २००७ मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला होता. परंतु ही खर्चीक बाब असल्याने आणि यात काही तांत्रिक बाबी पुढे आल्याने या उड्डाणपुलांची कामे रखडली होती. अखेर आता एमएमआरडीएने त्यांच्या कामांना ग्रीन सिग्नल दिला असून, त्यानुसार २२३.७० कोटींचा तीन उड्डाणपुलांचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेसाठी ठेवला आहे.
शहरातील मीनाताई ठाकरे चौक, तीन पेट्रोल पंप आणि नौपाडा एक्सचेंज या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यासंदर्भात २४ डिसेंबर २००७ मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार हे काम एमएसआरडीसीला देण्यात आले. परंतु याचा खर्च अधिक असल्याने त्यांनी हे काम करण्यास नकार दिला. त्यानुसार तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांच्या कार्यकाळात या तीन उड्डाणपुलांऐवजी येथे एकच तीन किमीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात येऊन याचा प्रस्तावही तयार झाला. परंतु या एका उड्डाणपुलाचा खर्च हा दुप्पट झाल्याने एमएमआरडीएने हा निधी देण्यास नकार दिला.
पालिकेने पुन्हा एकऐवजी तीन उड्डाणपुलांचा प्रस्ताव तयार केला. त्यानुसार काँक्रीटऐवजी स्टीलचे डिझाइन तयार करण्यात आले. म्हणजेच या उड्डाणपुलांचे प्रत्येक गर्डर हे स्टीलमध्ये तयार केले जाणार होते. परंतु याचाही खर्च अवास्तव असल्याने सुमारे २०० कोटीपर्यंतचा निधी देऊ, त्यावरील सर्व खर्च पालिकेने करावा, असे प्राधिकरणाने पालिकेला कळविले. तसेच प्लॅनमध्ये काही बदलही सुचविले होते.
अखेर एमएमआरडीएने उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुसरून व शहरांतर्गत झालेल्या वाहतूक बदलांचा विचार करून नव्याने प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. त्यानुसार लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर मीनाताई ठाकरे चौक, अल्मेडा चौक व महात्मा गांधी पथवर टेलीफोन एक्सचेंज चौक येथे हे तीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत.
या ठरावाला २० नोव्हेंबर २०१३ च्या महासभेने आणि ०७ मे २०१४ रोजी एमएमआरडीएने याला ग्रीन सिग्नल दिला असून, २२३.७० कोटींचा निधी देण्यास त्यांनी मान्यता दिली आहे. केवळ या कामाच्या तांत्रिक पर्यवेक्षणाचे काम पालिका करणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The remaining three flyovers will again be raised on the Palak's plate