मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर राहणार; राज्यात सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 08:52 PM2020-07-23T20:52:53+5:302020-07-23T20:53:18+5:30

येत्या ४८ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

Rain In Marathwada and Vidarbha, light to medium rains will be in the state | मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर राहणार; राज्यात सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर राहणार; राज्यात सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

Next

पुणे : विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. सध्या मॉन्सून ओडिशा, बिहार, तेलंगणा, हरियाना यांच्याबरोबर मराठवाडा आणि विदर्भात सक्रिय आहे. त्यामुळे कोकणासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधील तुरळक ठिकाणी, तसेच विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, येत्या ४८ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विशेषत: मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात घाट परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या २ दिवसांत राज्यात सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

गेल्या २४ तासांत विदर्भातील चंद्रपूर १४०, बल्लारपूर १३०, पोभुर्णा १००, मुल ९०, पौनी ८०, चामोर्शी, गौड पिंपरी, वणी ७०, जिवती, कोरपना ६०, भद्रावती, सोली ५०, मंगलूरपीर, राजुरा ४० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय सर्वदूर हलका पाऊस झाला होता़ मराठवाड्यातील अंबड ७०, किनवट, सोयेगाव ६०, शिरुर कासार ५०, हदगाव, हिमायतनगर, कळमनुरी, माहूर ४०, हिंगोली, खुलताबाद ३० मिमी पाऊस झाला होता. 

मध्य महाराष्ट्रात पाथर्डी ७०, शेगाव ४०, चाळीसगाव, कोपरगाव ५०, लोणावळा, पुणे (लोहगाव) ३०, बारामती, धुळे १० मिमी पाऊस पडला. कोकणातील मुंबई (सांताक्रुझ) ५०, ठाणे ३०, सावंतवाडी २० मिमी पावसाची नोंद झाली होती. 
़़़़़़़़
२४ व २५ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. २४ जुलै रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. अहमदनगर, नाशिक, सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून, २५ जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
़़़़़़़़़़
नागपुरात जोरदार सरी
गुरुवारी दिवसभरात नागपूरमध्ये जोरदार पाऊस झाला असून सायंकाळपर्यंत ६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जळगाव ४२, गोंदिया २३, परभणी १०, डहाणू ९ अमरावती ७, बुलढाणा ६, चंद्रपूर ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Rain In Marathwada and Vidarbha, light to medium rains will be in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.