‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 13:25 IST2026-04-20T13:24:35+5:302026-04-20T13:25:10+5:30
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ असे महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु वर्मा यांनी डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण करताना म्हटले आहे.

‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर: ‘भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करताना समाजातील अंतिम घटकाचा विकास करणे व त्या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. पालघरच्या सर्वांगीण विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही’, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी रविवारी डहाणू येथे केले.
अक्षय्य तृतीया आणि भगवान श्री परशुराम जयंतीच्या शुभ मुहूर्तावर डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथे वनबंधू ट्रस्ट आणि भारत विकास संगम यांच्याद्वारे पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सेवांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारत विकास संगमचे संरक्षक संजय पटेल, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, पालघरचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष लाडूलाल सोनी, योगायतन ग्रुपचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, ज्येष्ठ समाजसेवक सुशील सिंघानिया, आदी उपस्थित होते.
आरोग्यसेवा दुर्गम भागात पोहोचविणार
‘आरोग्य सुविधा दुर्गम भागात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे, हा आपला मुख्य संकल्प आहे. पालघर जिल्ह्यासारख्या आदिवासीबहुल क्षेत्रात रोजगार, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पालघरमध्ये ‘’आदर्श गाव’’ संकल्पना राबविण्यासाठी लोकभवन स्तरावर नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पालघरच्या विकासासाठी स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याची ग्वाही दिली.
फिरता दवाखाना उपक्रमाचे कौतुक
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या भूमिकेचा संदर्भ देत विकास प्रक्रियेत रांगेतील शेवटच्या माणसाला प्राधान्य देणे आमचे कर्तव्य आहे. वनबंधू ट्रस्टच्या माध्यमातून दुर्गम भागात फिरता दवाखाना, रुग्णवाहिका व डॉक्टर उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन वेगाने कार्य करेल, अशी ग्वाही दिली.