१० महिन्यांत ३४.३४ लाख अनधिकृत, विनातिकीट प्रवासी; मध्य रेल्वेकडून २०३.७६ कोटींचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 19:04 IST2026-02-11T19:04:03+5:302026-02-11T19:04:03+5:30
Central Railway News: मध्य रेल्वे प्रवाशांना बनावट तिकिटे तयार करणे/मिळविणे आणि त्यावर प्रवास करण्याऱ्या फसव्या मार्गांचा वापर करू नये असे आवाहन करते.

१० महिन्यांत ३४.३४ लाख अनधिकृत, विनातिकीट प्रवासी; मध्य रेल्वेकडून २०३.७६ कोटींचा दंड वसूल
Central Railway News: मध्य रेल्वेने प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवास अनुभव प्रदान करण्याच्या अढळ वचनबद्धतेनुसार नेटवर्कमध्ये अनधिकृत आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. योग्य आणि पद्धतशीर तिकीट तपासणी मोहिमेद्वारे, मध्य रेल्वेने २०२५-२६ (एप्रिल-२०२५ ते जानेवारी-२०२६) या आर्थिक वर्षात लक्षणीय परिणाम मिळवले आहेत.
मध्य रेल्वेच्या समर्पित तिकीट तपासणी पथकांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ (एप्रिल-२०२५ ते जानेवारी-२०२६) दरम्यान अनुचित किंवा अवैध प्रवास करणाऱ्या ३४.३४ लाख प्रवाशांना तिकिटाशिवाय प्रवास करताना पकडले, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील ३१.२८ लाख प्रवाशांच्या तुलनेत जवळपास ९.८ टक्के जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ (एप्रिल-२०२५ ते जानेवारी-२०२६) काळात दंड म्हणून २०३.७६ कोटी रुपयांची विक्रमी रक्कम वसूल करण्यात आली, जी गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत याच कालावधीत वसूल करण्यात आलेल्या १६७.६१ कोटी रुपयांच्या रकमेच्या तुलनेत २१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
३.४२ कोटी रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला
मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी अवैध प्रवास करणाऱ्या ३.५८ लाख प्रवाशांवर कारवाई केली. तर जानेवारी-२०२५ मध्ये ही संख्या ३.२७ लाख होती, जी जवळपास ९.५ टक्के वाढ दर्शवते. जानेवारी-२०२६ या महिन्यात उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड म्हणून २०.६० कोटी वसूल करण्यात आले आहेत, जे जानेवारी-२०२५ मध्ये १५.६२ कोटी रुपये होते, ज्यातून जवळपास ३२ टक्के वाढ दर्शवते. उपनगरीय रेल्वेत अनधिकृत प्रवास कमी करण्यासाठी वेळोवेळी विशेष तपासणी केली जाते. आर्थिक वर्ष २०२५-२६ (एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६) दरम्यान, मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट/अयोग्य तिकीटासह प्रवास करणाऱ्या ९.४९ लाख उपनगरीय प्रवाशांकडून दंड म्हणून २७.३९ कोटी रुपये वसूल केला आहे. जानेवारी महिन्यात अशा १.१४ लाख प्रकरणांत ३.४२ कोटी रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आला.
दरम्यान, मध्य रेल्वे प्रवाशांना आवाहन करते की, अधिकृत विक्रेत्यांनी किंवा रेल्वे स्टेशन बुकिंग काउंटरवरून किंवा एटीव्हीएमद्वारे जारी केलेल्या वैध तिकिटांसह प्रवास करावा किंवा त्यांनी त्यांच्या मोबाईल फोनवर वेबसाइटद्वारे रेल वन ॲप डाउनलोड करून रेल वन ॲपद्वारे तिकिटे बुक करू शकता. मध्य रेल्वे प्रवाशांना बनावट तिकिटे तयार करणे/मिळविणे आणि त्यावर प्रवास करण्याऱ्या फसव्या मार्गांचा वापर करू नये असे आवाहन करते.
- भुसावळ विभागात ८.१८ लाख प्रकरणांमध्ये ६८.८६ कोटी रुपये
- मुंबई विभागात १४.५१ लाख प्रकरणांमध्ये ६२.७३ कोटी रुपये
- पुणे विभागात ३.८४ लाख प्रकरणांमध्ये २३.७३ कोटी रुपये
- नागपूर विभागात ३.६८ लाख प्रकरणांमध्ये २२.९१ कोटी रुपये
- सोलापूर विभागात २.०६ लाख प्रकरणांमध्ये ९.४६ कोटी रुपये
- मुख्यालय अंतर्गत २.०६ लाख प्रकरणांमध्ये १६.०६ कोटी रुपये.