अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली? दिल्लीला बोलावले आहे का? छगन भुजबळांनी सगळे सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 17:35 IST2025-01-24T17:34:45+5:302025-01-24T17:35:23+5:30
NCP AP Group Mla Chhagan Bhujbal With Amit Shah: अमित शाह यांनी आपल्याला दिल्लीत भेटायला बोलावले आहे का, या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले.

अमित शाह यांच्यासोबत काय चर्चा झाली? दिल्लीला बोलावले आहे का? छगन भुजबळांनी सगळे सांगितले
NCP AP Group Mla Chhagan Bhujbal With Amit Shah: महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप तसेच पालकमंत्रीपदावरून मोठी धुसपूस असल्याचे पाहायला मिळाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तिखट शब्दांत हल्लाबोल केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली. छगन भुजबळ हे अद्यापही नाराज असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच एका कार्यक्रमात भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि छगन भुजबळ एकाच मंचावर आले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नाशिक दौऱ्यावर आले होते. अमित शाह यांनी मालेगावच्या अजंग येथे उभारलेल्या व्यंकटेश्वरा कृषी फार्मला भेट दिली. तसेच शेतकऱ्यांसाठीच्या माती परीक्षण केंद्र व अगरबत्ती कारखान्याचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. सहकार परिषदेच्या माध्यमातून अमित शाह यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या छगन भुजबळांकडे लक्ष जाताच अमित शाह यांनी त्यांना बोलवीत आपल्या जवळच्या खुर्चीवर बसवले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ संवाद झाला. अमित शाह यांच्या कृतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अमित शाह यांच्याशी नेमके काय बोलणे झाले, याबाबत छगन भुजबळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
अमित शाह यांनी आपल्याला दिल्लीत भेटायला बोलावले आहे का?
अमित शाह यांचे मोठेपण आहे की, मी लांब बसलो होतो. पण त्यांनी जवळ बसवून घेतले. चर्चा काय, तीन वर्षांपूर्वी हे माझ्याकडे आले, तेव्हा विश्वास नव्हता की असे होऊ शकते. या लोकांनी किमया करून दाखवली आहे, असे ते म्हणाले. राजकारणावर काही चर्चा झालेली नाही. यानंतर दिल्लीला जाणार का, अमित शाह यांनी आपल्याला दिल्लीत भेटायला बोलावले आहे का, असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, दिल्ली देशाची राजधानी आहे. तुम्ही आम्ही कधीही दिल्लीला जाऊ शकतो, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
दरम्यान, अलीकडेच शिर्डी येथे झालेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात छगन भुजबळ गेले होते. मात्र ते अवघ्या दोन तासात शिर्डीतील शिबिरातून माघारी परतले होते. यावेळी छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली होती. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट, अजित पवारांवर उघडपणे व्यक्त केलेली तीव्र नाराजी यावरून भाजपाच्या कोट्यातील मंत्रीपद मिळावे, यासाठी छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.