MSRTC: एसटीला १२० नव्हे तर केवळ ९० कोटींचा तोटा, परिवहनमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 07:06 IST2026-02-06T07:05:36+5:302026-02-06T07:06:32+5:30
MSRTC Financial Crisis: एसटीचा तोटा १२० कोटी नाही, तर ९० कोटी असल्याबाबत शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

MSRTC: एसटीला १२० नव्हे तर केवळ ९० कोटींचा तोटा, परिवहनमंत्र्यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या उत्पन्न आणि खर्चातील तफावत जानेवारीत १२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. १२ हजार कोटी रुपयांचा संचित तोटा सहन करणाऱ्या एसटीचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेने उत्पन्न मात्र वाढत नाही. तर एसटीचा तोटा १२० कोटी नाही, तर ९० कोटी असल्याबाबत शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
एसटी महामंडळाच्या ३१ पैकी १७ विभाग तोट्यात असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी असे मोठे विभाग सातत्याने तोट्यात आहेत. एसटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाला गेल्या ऑक्टोबरमध्ये ९७२ कोटी उत्पन्न मिळाले होते. तर खर्च मात्र १ हजार ४५ कोटी इतका होता. दरम्यान, उत्पन्नात डिसेंबरमध्ये वाढ झाली असताना जानेवारीत पुन्हा घसरण झाली आणि खर्चात मात्र वाढ झाली.
"कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा वाढीव हप्ता देण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने महामंडळाने उत्पन्नामधून ६५ कोटी रुपये कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे जानेवारीत खर्च जास्त वाटत असला तरी तो सरासरी कमीच आहे. उत्पन्नवाढीसाठी आम्ही योजनादेखील सुरू केल्या आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील", असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.