कोट्यवधींचे बियाणे व्यापार्‍यांकडे पडून !

By Admin | Updated: July 11, 2014 00:41 IST2014-07-11T00:41:12+5:302014-07-11T00:41:12+5:30

अकोला जिल्ह्यात पेरण्या लांबल्या: शेतकर्‍यांची बियाणे खरेदीकडे पाठ

Millions of seeds are sold by traders! | कोट्यवधींचे बियाणे व्यापार्‍यांकडे पडून !

कोट्यवधींचे बियाणे व्यापार्‍यांकडे पडून !

अकोला: वर्‍हाडात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश स्थितीचा फटका शेतकर्‍यांसोबतच कृषिसेवा केंद्रांनाही बसला आहे. पावसाअभावी सर्व व्यवहार ठप्प पडले असून, बाजारपेठेत स्मशान शांतता पसरली आहे. शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीकडे पाठ फिरविली असून, परिणामी कृषिसेवा केंद्रांचे कोट्यवधी रुपयांचे बियाणे पडून आहे.
जुलै महिना सुरू होऊन दहा दिवस उलटले तरी वर्‍हाडात पावसाने हजेरी लावली नाही. गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडला. तो सावत्रिक नसल्याने पेरण्या होणे शक्य नाही. याचा प्रभाव कृषी बाजारपेठेवर मोठय़ा प्रमाणात पडला आहे. व्यापार्‍यांनी व कृषिसेवा केंद्र संचालकांनी विक्रीसाठी कोट्यवधीचे बियाणे व खते खरेदी करून ठेवले आहे; मात्र पाऊसच नसल्याने शेतकर्‍यांनी बियाणे व खत खरेदीकडे पाठ फिरविली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकर्‍यांनी बियाण्यांची खरेदी केली होती. त्यावेळी बाजारपेठेत वर्दळ होती. आता मात्र शेतकरी पावसाचा रागरंग पाहता हात आवरता घेताना दिसत आहे. यावर्षी जिल्हा कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगामात पेरणीसाठी ७५ हजार ८४ क्विंटल सोयाबिन बियाण्यांची मागणी केली होती. त्यापैकी विविध कंपन्यांकडून ६६ हजार ७९ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. उपलब्ध बियाण्यांपैकी ५२ हजार ५९४ क्विंटल बियाण्यांचीच शेतकर्‍यांनी खरेदी केली आहे. १३ हजार ४८५ क्विंटल बियाणे कृषिसेवा केंद्रांकडे पडून आहे. खरीप हंगामासाठी कपाशीच्या पाच लाख बॅग्सची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ६ लाख १६ हजार ४१२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला. आतापर्यंत केवळ ४ लाख ७३ हजार क्विंटल बियाण्यांचीच विक्री झाली असून, २ लाख १६ हजार ३३९ क्विंटल बियाणे शेतकर्‍यांकडे पडून आहेत.

** दोन हजार रुपये किलोचे बियाणे विकावे लागणार तीन हजार रुपये क्विंटलने
न विकल्या गेलेले कपाशी, मुग, उडिदाचे बियाणे कंपन्या परत घेतात; मात्र सोयाबिनचे बियाणे परत घेत नाहीत. त्यामुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान होणार असून, २२५0 रुपये किलो असलेले बियाणे त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन हजार रुपये क्विंटलने सोयाबीनच्या भावात विकावे लागणार आहे.

** कृषिसेवा केंद्र मालकांना जबर फटका
कृषिसेवा केंद्रांकडे सध्या १३ हजार ४८५ क्विंटल सोयाबीनचे बियाणे पडून आहे. हे बियाणे जवळपास ४0 कोटी रुपयांचे असून, शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याने व्यापार्‍यांना हे बियाणे कृषि उत्पन्न बाजार समितीत विकावे लागणार आहे. अनेक दुकानदार पाचशे ते सहाशे रुपये कमी भावाने बियाण्यांची विक्री करीत आहेत. तसेच कपाशीच्या बियाण्यांची विक्री झाली नसल्यामुळेही व्यापार्‍यांचे नुकसान झाले आहे. आता हे बियाणे मूळ किंमतीतच कंपनीला परत करावे लागणार आहेत.

Web Title: Millions of seeds are sold by traders!