Good News : Bakarwadi, mango, strawberries in the train | खुशखबर! रेल्वेत बसल्याजागी बाकरवडी, आंबा, स्ट्रॉबेरी..
खुशखबर! रेल्वेत बसल्याजागी बाकरवडी, आंबा, स्ट्रॉबेरी..

ठळक मुद्दे‘आयआरसीटीसी’ प्रयत्नशीलप्रसिध्द हॉटेलमधील पदार्थही प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिले जाणार

पुणे : रेल्वेतून प्रवास करताना पुण्यातील प्रसिध्द बाकरवडी, कोकणातील हापुस आंबा अन् महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी खायचीय... मग लवकरच त्याची चव रेल्वेत बसल्याजागी चाखायला मिळणार आहे. इंडियन रेल्वे केटरींग अ‍ॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) ई-केटरिंगअंतर्गत ही फळे व काही रुचकर पदार्थ प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे. कोणतीही रेल्वे पुणे स्थानकात येण्यापुर्वी दोन तास आदी ऑर्डर दिल्यानंतर बसल्याजागी हे पदार्थ प्रवाशांना मिळतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे. 


रेल्वे प्रवाशांना दर्जेदार आणि प्रसिध्द हॉटेल, बँडचे खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी ‘आयआरसीटीसी’कडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. रेल्वेने लांबपल्ल्याचा प्रवास करताना प्रवाशांना अनेकदा स्थानिक भागातील पदार्थ खाण्याची वेळ येते. स्थानकांवर अनधिकृतपणे या पदार्थांची सर्रास विक्री होते. तसेच प्रवाशांना या भागात प्रसिध्द असलेले पदार्थ मिळत नाहीत. काही प्रवाशांकडून खासगी कंपन्यांच्या अ‍ॅपवरून पदार्थ ऑर्डर केले जातात. पण त्याचा दर्जा चांगला नसतो. दरही खुप जास्त असतात. त्यामुळे प्रवाशांची फसवणुक होते. 
कोकणातून जाणाºया रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांना ई-केटरींगच्या माध्यमातून हापुस आंबा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आता पुणे व परिसरातील तसेच लगतच्या जिल्ह्यांमधील लोकांच्या जिभेचे चोचले पुरविणारे पदार्थ देण्याचा विचार ‘आयआरसीटीसी’कडून केला जात आहे. पुण्यातील प्रसिध्द बाकरवडी, महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी, प्रसिध्द चिवडा, वेफर्स असे विविध पदार्थ ई-केटरींगवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये हापुस आंब्याचीही भर पडणार आहे. तसेच पुणे रेल्वे स्थानकाजवळच्या किमान एक किलोमीटर अंतरातील प्रसिध्द हॉटेलमधील पदार्थही प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यांच्याशी याबाबतचा करार केला जाईल. खाद्यपदार्थांचा दर्जा आणि दर पाहूनच हे पदार्थ ई-केटरिंगवर मिळतील. प्रवाशांना आयआरसीटीसीचे संकेतस्थलळावर किंवा अ‍ॅपच्या माध्यमातून या पदार्थांची आॅर्डर देता येईल. सध्या पिझ्झा, बर्गरसह काही हॉटेलमधील जेवण यावर उपलब्ध आहे. 

.............

पुणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांसह इतर प्रमुख स्थानकांवरही पुण्यातील प्रसिध्द रुचकर पदार्थ खायला मिळावेत, ही उद्देश आहे. तसेच स्टॉबेरी, आंब्याची चवही चाखता यावी, यासाठी ई-केटरिंगवर उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. या पदार्थांच्या दर्जाची खात्री असेल. ‘आयआरसीटीसी’कडून तपासणी करून हे पदार्थ प्रवाशांना दिले जातील. त्यासाठी दोन तास आधी आॅर्डर द्यावी लागेल. संबंधित विक्रेत्यांकडून गाडी स्थानकात आल्यानंतर संबंधित पदार्थ प्रवाशांना मिळतील. सध्या मोजकेच पदार्थ उपलब्ध असून त्याचे प्रमाण वाढविले जात आहे.
- गुरूराज सोना, सहायक व्यवस्थापक, आयआरसीटीसी, पुणे


Web Title: Good News : Bakarwadi, mango, strawberries in the train
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.