उडता पंजाब ऐकले होते, आता ‘उडता महाराष्ट्र’ होऊ लागलाय; राजू शेट्टींचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 14:27 IST2026-05-19T14:26:27+5:302026-05-19T14:27:15+5:30
नीटचा पेपर फोडणाऱ्या लोकांच्या घरावर बुलडोझर चालवणार का?

उडता पंजाब ऐकले होते, आता ‘उडता महाराष्ट्र’ होऊ लागलाय; राजू शेट्टींचे टीकास्त्र
कराड : साधू-संतांचा महाराष्ट्र आता बदलत चालला आहे. अमली पदार्थांचे प्रमाण वाढल्याने गुन्ह्याच्या घटना घडत आहेत. हे सरकार काय करतंय? उडता पंजाब नाव ऐकले होते, आता उडता महाराष्ट्र निर्माण होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत समाजात द्वेष पसरवून काही लोक आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
कराडात सोमवारी ‘लोकशाहीतील स्वातंत्र्यसैनिक पंजाबराव पाटील’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक गुजर उपस्थित होते.
तब्बल ६०० एकर जमीन ‘शक्तिपीठ’साठी
संत सावता माळी यांच्या संजीवन समाधीमुळे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या अरण गावातूनच शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावित आहे. ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ हा अभंग संत सावता माळी यांनी याच भूमीत रचला. आषाढी वारीनंतर दरवर्षी विठ्ठलाची पालखी अरण येथे येते, अशी परंपरा आहे. या गावातील सुमारे ६०० एकर जमीन महामार्गासाठी संपादित होणार आहे हे अत्यंत चुकीचे आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.
नीटचा पेपर फोडणाऱ्या लोकांच्या घरावर बुलडोझर चालवणार का?
बहुजनांची पोरं शिकू नयेत, म्हणून मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत. नीटचे पेपर फोडले जात आहेत. नीटचा पेपर फोडणाऱ्या लोकांच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार का, असा सवालदेखील राजू शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला.