Video: ”दादा, मला माफ करा..”; कट्टर विरोधकही जेव्हा माफी मागतो, ४० सेकंदातच महेश लांडगेंनी मंच सोडला..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 22:36 IST2026-01-30T22:34:02+5:302026-01-30T22:36:57+5:30
Mahesh Landge cries Ajit Pawar Shradhanjali: "दादा, मला माफ करा.." अजित पवारांच्या निधनानंतर कट्टर विरोधक महेश लांडगे भावूक! भरसभेत माफी मागत अवघ्या ४० सेकंदात सोडला मंच.

Video: ”दादा, मला माफ करा..”; कट्टर विरोधकही जेव्हा माफी मागतो, ४० सेकंदातच महेश लांडगेंनी मंच सोडला..
पिंपरी-चिंचवड: राजकारणातील वैर हे केवळ विचारांचे असते, मनाचे नाही, याचा प्रत्यय आज पिंपरी-चिंचवडमध्ये आला. शहराचे भाग्यविधाते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आयोजित श्रद्धांजली सभेत त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि भाजप आमदार महेश लांडगे यांना आपला शोक अनावर झाला. भरमंचावर उभं राहून "दादा, मला माफ करा..." असे म्हणत लांडगे भावूक झाले आणि अवघ्या ४० सेकंदात शब्द अपुरे पडल्याने त्यांनी मंच सोडला.
नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडच्या वर्चस्वावरून अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता. निवडणुकीच्या रणधुमाळीत महेश लांडगे यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली होती. त्यांच्यातील वाक्युद्ध संपूर्ण राज्यात गाजले होते. या राजकीय चकमकीला १५ दिवस उलटत नाहीत तोच अजितदादांचा विमान अपघातात अंत झाला. ज्या नेत्यावर १५ दिवसांपूर्वी टीका केली होती, तो आता आपल्यात नाही, या कल्पनेनेच लांडगे भावूक झाले.
४० सेकंदांचा तो भावनिक क्षण
श्रद्धांजली वाहण्यासाठी महेश लांडगे जेव्हा उभे राहिले, तेव्हा त्यांचा गळा दाटून आल्याने ते पुढे बोलू शकले नाहीत आणि अवघ्या ४० सेकंदात त्यांनी स्टेज सोडले.
”दादा, मला माफ करा..”, ४० सेकंदातचं महेश लांडगेंनी मंच सोडला..#Ajitpawar#NCP#MaheshLandge#PCMC#Pune#AjitPawarPlaneCrashpic.twitter.com/29eGXjwlAs
— Lokmat (@lokmat) January 30, 2026
शहरावर शोककळा
अजित पवारांचे पिंपरी-चिंचवडवर असलेले प्रेम सर्वश्रुत आहे. त्यांच्या निधनानंतर पक्षभेद विसरून आज सर्वच पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते स्तब्ध झाले होते. महेश लांडगे यांच्या या कृतीने उपस्थित असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या.