दहावीच्या निकालात मायबोली मराठीवर इंग्रजीची कुरघोडी!

By Admin | Updated: June 18, 2014 04:54 IST2014-06-18T04:54:17+5:302014-06-18T04:54:17+5:30

शालेय शिक्षणात प्रथम भाषा म्हणून मराठीचा आग्रह धरला जात असला, तरी नवी पिढी मातृभाषेत खूपच कच्ची असल्याचे दिसून येते.

Class 10 results in English English! | दहावीच्या निकालात मायबोली मराठीवर इंग्रजीची कुरघोडी!

दहावीच्या निकालात मायबोली मराठीवर इंग्रजीची कुरघोडी!

मनोज ताजने, गोंदिया
शालेय शिक्षणात प्रथम भाषा म्हणून मराठीचा आग्रह धरला जात असला, तरी नवी पिढी मातृभाषेत खूपच कच्ची असल्याचे दिसून येते. दहावी परीक्षेच्या निकालात राज्यातील नऊही विभागीय परीक्षा मंडळांमध्ये मराठीचा निकाल इतर भाषांच्या तुलनेत चांगलाच घसरला आहे. मराठी भाषेत उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण राज्यभरात ९४.२९ असले तरी ते इतर भाषांच्या तुलनेत सहाव्या क्रमांकावर आहे.
विभागनिहाय तुलना केल्यास मराठीत सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९८.४८), तर सर्वांत कमी निकाल नागपूर विभागाचा (८९.०८) लागला आहे.
राज्यभरातील नऊ विभागीय शिक्षण मंडळांमध्ये एकूण ११ लाख ९९ हजार ५०७ विद्यार्थ्यांनी ‘प्रथम भाषा’ म्हणून मराठीची निवड करून परीक्षा दिली. त्यापैकी ११ लाख ३१ हजार ५६ विद्यार्थी, अर्थात ९४.२९ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. यासोबतच हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, तामीळ, तेलगू, सिंधी, बंगाली आणि पंजाबी अशा एकूण ११ भाषांना ‘प्रथम’ भाषा म्हणून निवडून विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्वाधिक प्रमाण (टक्केवारी) इंग्रजी भाषेत आहे.
इंग्रजीला प्रथम भाषा निवडून परीक्षा देणाऱ्या २ लाख ४९३ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९५ हजार ६७४ विद्यार्थी, अर्थात ९७.६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल ९६.९४ टक्के विद्यार्थी गुजराती भाषेत, ९६.९० टक्के सिंधी भाषेत, ९५.८७ टक्के कन्नड भाषेत, ९४.९० उर्दू भाषेत आणि त्यानंतर सहाव्या क्रमांकावर मराठीचा (९४.२९ टक्के) क्रमांक लागतो.
मातृभाषा म्हणून ज्या भाषेचा आपण गवगवा करतो त्या मराठीची ही पिछेहाट चिंतनाचा विषय ठरणार आहे. सध्या शहरीच नाही, तर
ग्रामीण भागातही वाढत असलेले इंग्रजीचे फॅड आणि या भाषेची वाढलेली व्याप्ती यामुळेच इंग्रजी भाषेत सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे दिसून येते.

Web Title: Class 10 results in English English!