"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:55 IST2025-10-29T13:55:03+5:302025-10-29T13:55:53+5:30
Eknath Khadase News: आमदार एकनाथ खडसेंच्या जळगावातील शिवराम नगरातील मुक्ताई बंगल्यातील चोरीला वेगळे वळण लागण्याची शक्यताय. खडसेंनी आज, बुधवारी... या चोरीच्या घटनेसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.

"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
-प्रशांत भदाणे
जळगाव - आमदार एकनाथ खडसेंच्याजळगावातील शिवराम नगरातील मुक्ताई बंगल्यातील चोरीला वेगळे वळण लागण्याची शक्यताय. खडसेंनी आज, बुधवारी... या चोरीच्या घटनेसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत.
याबाबत माहिती देताना एकनाथ खडसे यांनी सांगितले की, माझ्या घरी नियोजनबद्ध चोरी झाली आहे, चोरी होण्यापूर्वी पथदिवे बंद करण्यात आले होते. सोने आणि रोकडसोबत सीडी, पेनड्राईव, महत्वाची कागदपत्रे यांची चोरी झाली आहे. चोरीला गेलेले कागदपत्र हे एका गैरव्यवराशी संबंधित होते. त्यामुळे चोरीचा उद्देश काय होता हे समजले पाहिजे.
यावेळी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करतांना एकनाथ खडसे म्हणाले की, ''माझ्या बेडरूममध्ये महत्त्वाची कागदपत्रे आहेत हे कोणालातरी माहित होते. तीच कागदपत्रे चोरीला गेली आहेत. काही पेन ड्राईव्हमध्ये गाणी होती. सीडी मात्र महत्त्वाच्या होत्या. कोणाच्या बाबतीत तरी वैयक्तिक स्वरूपाच्या त्या होत्या, त्यामुळे त्याबाबत मी अधिक बोलू शकत नाही. मी मुंबईला असताना ही बातमी मला समजली. मी घरी आल्यानंतर पाहणी केली. भेटवस्तू चोरी गेल्या असं लक्षात आलं. रात्री १२ वाजून ३७ मिनिटांनी लाईट बंद झाले, त्यानंतर चोरी झाली. वॉचमन दिवाळीनिमित्त सुटीवर होता. तो इथे पूर्णवेळ राहत होतो, तेव्हा CCTV कार्यरत होते, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
एकनाथ खडसे म्हणाले की अत्यंत महत्वाची अशी कागदपत्र बेडरूम मध्ये होती, ती गायब झाली आहेत. महत्वाच्या सीडी चोरीला गेल्या आहेत. कोपऱ्यात पडलेल्या सीडी फक्त राहिल्या आहेत. भ्रष्टाचाराचे कागदपत्र माहिती अधिकारातून मिळवलेले होते ते कागदपत्र चोरी गेले आहेत. माझा पोलिसांवर विश्वास होता, त्यामुळे माझ्या घरी चोरी होईल असे वाटले नव्हते.
दरम्यान, या चोरीच्या घटनेवरून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर देखील खडसेंनी यावेळी बोट ठेवलं. ते म्हणाले की, मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर तसेच माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या बंगल्यात देखील दरोडा पडला. पोलिस फक्त हफ्ते खाण्यात व्यस्त आहेत. वाळू तस्करी वाढली आहे, पोलिसांचा वचक संपलेला आहे. चोरटे चोरीच्या हेतूने आले होते, तर चोरी झाली पाहिजे होती. इथून पेन ड्राइव्ह, सीडी, कागदपत्रे चोरीला गेले आहेत. पेन ड्राइव्हमधे तर गाणी होते, पण तेदेखील ते घेऊन गेले आहेत. मला गाणी ऐकायला आवडतात. पेन ड्राइव्हमध्ये गाणी होती, असे खडसे यांनी सांगितले.
चोरी होण्याआधी पथदिवे बंद कसे झाले, यापूर्वी माझ्या घरची रेकी झाली होती का? चोरट्यांना नेमके काय हवे होते, गैरव्यवहाराचे कागदपत्रे त्यांनी चोरी केले आहेत. सीसीटीव्ही मध्ये चोरट्यांकडे तीन बॅग असल्याचे दिसत आहे. नियोजनबद्ध चोरी झाली आहे, याबाबत कुणाचा काय हेतू होता ते पोलिस तपासात ते स्पष्ट होईल, असेही खडसे म्हणाले.