शरद पवारांच्या PC नंतर मोठा ट्विस्ट; पटेल, तटकरे 'देवगिरी'वर तर पार्थ पवार गोविंदबागेत पोहचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 14:04 IST2026-01-31T14:03:13+5:302026-01-31T14:04:23+5:30
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राख सावडण्याचा विधी सुरू होता. तेव्हाच प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

शरद पवारांच्या PC नंतर मोठा ट्विस्ट; पटेल, तटकरे 'देवगिरी'वर तर पार्थ पवार गोविंदबागेत पोहचले
मुंबई - अजित पवारांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत आहेत. अजित पवारांची राख सावडण्यानंतर रात्रीच सुनेत्रा पवार मुंबईत देवगिरी निवासस्थानी पोहचल्या. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील अशी चर्चा सुरू झाली. त्यात शरद पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत मला शपथविधीबाबत कुठलीही कल्पना नाही असं विधान केले. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या निर्णयाबाबत शरद पवार अनभिज्ञ असल्याचे पुढे आले. शिवाय तटकरे, पटेल हे त्यांचे पक्षाचे निर्णय घेत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे असंही पवारांनी म्हटलं होते. मात्र या पत्रकार परिषदेनंतर पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी गोविंदबागेत पोहचले.
बारामती येथे शरद पवारांच्या निवासस्थानी पार्थ पवार गेले. तिथे या दोघांची भेट झाली. त्यानंतर पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी फोनवरून संवाद केल्याचे पुढे आले आहे. दुसरीकडे मुंबईत देवगिरी निवासस्थानी जात सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जनतेची भावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवारांच्या नावाची निवड केल्याचं तटकरेंनी बाहेर माध्यमांना सांगितले. परंतु शपथविधीबाबत विचारले असता तटकरे यांनी दुपारी २ वाजता विधिमंडळ सदस्यांची बैठक होईल. त्यात सुनेत्रा पवारांच्या नावावर एकमत झाल्यानंतर राष्ट्रवादीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येईल. पुढचा निर्णय ते घेतील असं तटकरेंनी म्हटलं.
पवार कुटुंबाला अंधारात ठेवले?
अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राख सावडण्याचा विधी सुरू होता. तेव्हाच प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर तातडीने विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलावण्याचा निर्णय झाला. आज शनिवारी पक्षाच्या आमदारांची बैठक होईल. त्यात सुनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होऊन लगेचच त्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील अशी बातमी झळकली. रात्री उशिरा सुनेत्रा पवारही मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या. त्यामुळे या बातमीला आणखी बळ मिळाले. सकाळी शरद पवारांना याविषयी विचारले असता ते मला काही माहिती नाही असं म्हणाले. शिवाय त्यांचे पक्षाचे निर्णय सुनील तटकरे, प्रफुल पटेल घेतात. तो त्यांचा अधिकार आहे असं त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या घडामोडीपासून शरद पवार कुटुंबाला अंधारात ठेवले का असा प्रश्न विचारला जात आहे.