"आयुष्य नीट जगा, मस्तपैकी राहा अन्..."; मृत्यूपूर्वी अजित पवारांनी दिलेला 'तो' अखेरचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:33 IST2026-01-28T11:31:56+5:302026-01-28T11:33:09+5:30
Plane Crash in Baramati: ज्या बारामतीतून अजित पवारांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली. त्याच बारामतीत अजित पवारांचे अकाली निधन होणे हा विचित्र योगायोग समोर आला.

"आयुष्य नीट जगा, मस्तपैकी राहा अन्..."; मृत्यूपूर्वी अजित पवारांनी दिलेला 'तो' अखेरचा सल्ला
बारामती - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाले आहे. बारामती येथील विमान अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अजित पवारांसारखा नेता महाराष्ट्राने गमावला आहे. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. कालपर्यंत राजकारणात सक्रीय असणारे अजित पवार आज सकाळी या जगात नाहीत यावर कुणाचा विश्वास बसत नाही. अलीकडेच अजित पवारांनी एका भाषणावेळी लोकांना सल्ला दिला होता. हा सल्ला पुन्हा व्हायरल झाला आहे.
चाकण येथील जाहीर सभेत अजित पवार म्हणाले होते की, “राजकारण लय वंगाळ आहे. जमिनीचे पैसे आले असतील तर राजकारणात पडू नका. धंदा-पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा आणि निर्व्यसनी जीवन जगा. काहींना जमिनीचे पैसे आले की लगेच राजकारणात उडी घ्यायची हौस होते. बायकोला उभं करा, तू निवडणूक लढ..असं करू नका. पैसे संपले की काय करणार? दोन हाताला चुना लावून ‘ठो-ठो’ करणार? त्याचा काहीच उपयोग नाही, साधुसंतांनीही आपल्याला तेच सांगितले असल्याचे नमूद करत अजित पवारांनी “धंदा-पाणी सांभाळा, आयुष्य नीट जगा असा सल्ला लोकांना दिला होता.
पवार कुटुंबावर मोठा आघात
अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राने उमदा नेता गमावला. राजकारणात टीका होते, अजित पवार फार कमी टीका करायचे. त्यांनी वेगळी भूमिका घेतली तेव्हा आम्ही टीकेचे बाण सोडले. ते शांत राहून काम करत राहिले. राजकारणात अशी माणसे दुर्मिळ असतात. अत्यंत उमद्या वयात ते आपल्यातून निघून गेले. राजकारणात फार मोठी खेळी ते करू शकले असते. अलीकडेच अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले त्याचा आनंद सगळ्यांना झाला, कार्यकर्त्यांना होता. काका पुतणे एकत्र आले त्याचा आम्हाला आनंद होता पण हा आनंद फार काळ टिकला नाही. राजकारण कोणत्याही स्तराला गेले तरी पवार कुटुंब अभेद्य राहिले. पवार कुटुंबावर हा सगळ्यात मोठा आघात आहे. शरद पवारांनंतर अजित पवार कुटुंबाचे कर्ते पुरुष होते. अशा कर्त्या पुरुषाचे जाणे यासारखे भीषण दु:ख कशात नाही असं सांगत संजय राऊतांनी अजित पवारांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
बारामतीत शेवट
ज्या बारामतीतून अजित पवारांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली. त्याच बारामतीत अजित पवारांचे अकाली निधन होणे हा विचित्र योगायोग समोर आला. अजित पवार हे प्रशासनावर पकड असलेले नेते म्हणून ओळखले जायचे. सकाळी ६ वाजल्यापासून ते कामाला सुरुवात करायचे. विकास कामांची पाहणी दौरा असेल, अगदी सकाळी ते रस्त्यावर फिरून लोकांची कामे सोडवताना दिसायचे. आज मुंबईतून बारामतीला ते चालले होते. मात्र आजची सकाळी त्यांच्या आयुष्यातील शेवटची सकाळ ठरली आहे. ज्या बारामतीत त्यांचा जन्म झाला तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.